फेसबुक कर्मचाऱ्यांची माहिती दहशतवाद्यांच्या हाती

1

सामना ऑनलाईन। न्यूयॉर्क

फेसबुकचे जे कर्मचारी दहशतवाद्यांच्या प्रचार व प्रसाराच्या पोस्ट रोखण्याचे काम करतात त्यांची माहिती थेट दहशतवाद्यांच्या हाती पडली आहे. यामुळे सर्वच कर्मचारी धास्तावले असून काहीजणांनी फेसबुकलाच रामराम करण्याची तयारी केली आहे. तांत्रिक बिघाडामुळे हा प्रकार घडल्याचे फेसबुकने म्हटले आहे.

फेसबुकच्या कार्यालयात विविध विभाग आहेत. यापैकी २२ विभागात काम करणाऱ्या १ हजार कर्मचाऱ्यांची माहिती दहशतवाद्यांना मिळाली आहे. हे सर्व कर्मचारी दहशतवाद्यांचा प्रचार व प्र्साराबरोबरच त्यांना फेसबुकवरुन हटवण्याचे काम करतात. तसेच इतर फेसबुक युजरकडून पोस्ट होणारे अश्लिल व आक्षेपार्ह मजकुर रोखण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात फेसबुकमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. तो ताबडतोब दुरुस्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. पण तरीही या कर्मचाऱ्यांची माहिती लीक झाली असून त्यांनी ज्या यूजर्सचे अकाऊंट बंद केले, ज्यांच्या पोस्ट हटवल्या त्यांना मिळाली आहे.

दहशतवाद्यांना आपली माहिती मिळाल्याने कर्मचारी हादरले आहेत. दहशतवादी आता थेट आपल्या घरी येतील, कुटुंबाला ठार करतील अशी भीती कर्मचाऱ्यांना वाटू लागली आहे. यामुळे अनेकांनी कार्यालयात येणेच बंद केले असून एकाने राजीनामाच दिला आहे. त्यानंतर इतरांनीही राजीनाम्याची तयारी सुरु केली आहे. दरम्यान कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी फेसबुकने घेतली असून त्यासाठी सुरक्षा रक्षकही नेमले आहेत.