फेडररमुळे प्रेरणा मिळाली

सामना ऑनलाईन । चेन्नई

हिंदुस्थानच्या ४८ वर्षीय विश्वनाथन आनंदने जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावून आपण अजून संपलेलो नाही हे बुद्धिबळ विश्वाला दाखवून दिले. माझा फॉर्म हरवला होता. मनासारखा खेळ होत नव्हता. मात्र सदाबहार टेनिसपटू रॉजर फेडररने अपयशाच्या गर्तेतून फिनिक्स भरारी घेताना सरत्या वर्षात जबरदस्त पुनरागमन करत अनेक स्पर्धा जिंकल्या. या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररमुळे प्रेरित होऊन मीही माझ्या बुद्धिबळ खेळात पुनरागमन करू शकलो, अशी प्रांजळ कबुली पाच वेळच्या जगज्जेत्या विश्वनाथन आनंदने दिली.

स्पेनच्या राफेल नदालनेही दुखापतीवर मात करून वेळोवेळी यशस्वी पुनरागमन केलेले आहे. याच महान टेनिसपटूंना डोळ्यांसमोर ठेवून मी माझ्या मेंदूला प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मॅग्नस कार्लसनसारख्या ‘नंबर वन’ खेळाडूला हरवून मी वर्ल्ड चॅम्पियन होऊ शकलो. शिवाय आऊट ऑफ फॉर्म असताना पत्नीने सातत्यानेच माझे मनोबल वाढविण्यासाठी प्रयत्न केला. त्यामुळे तीसुद्धा या विजेतेपदाची तितकीच हकदार आहे, असेही आनंद म्हणाला.