अमेरिकन ओपन टेनिसमध्ये नदाल, फेडरर येणार आमने-सामने

सामना ऑनलाईन, न्यूयॉर्क

स्पेनचा राफेल नदाल आणि स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर या स्टार खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून अमेरिकन ओपन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेच्या चौथ्या फेरीत प्रवेश केला. विजयी घोडदौड कायम राखल्यास उभय खेळाडू उपांत्य फेरीत आमने-सामने उभे ठाकतील.

३१ वर्षीय राफेल नदालने अर्जेंटिनाच्या लियोनार्डो मेयरचा ६-७ (३/७), ६-३, ६-१, ६-४ असा पराभव करून चौथी फेरी गाठली. उपांत्यपूर्व लढतीत नदालची गाठ युक्रेनच्या अलेक्झांडर डोलगोपोलोव याच्याशी पडेल. नदाल व डोलगोपोलोव आठ वेळा एकमेकांना भिडले असून त्यात नदालने सहा वेळा बाजी मारलेली आहे.

दुसरीकडे पाच वेळच्या चॅम्पियन रॉजर फेडररने तिसऱया फेरीत ३१ व्या मानांकित फेलिसियानो लोपेजचा ६-३, ६-३, ७-५ असा सरळ सेटमध्ये पराभव करून आगेकूच केले. आता फेडररची गाठ फिलिप कोलश्रेबरशी पडेल. फेडररने कोलश्रेबरला आतापर्यंत ११ वेळा हरवलेले आहे. फेडररला फ्रान्सेस टियाफो व मिखेल युज्री यांच्याविरुद्धच्या सुरुवातीच्या दोन लढतींत पाच सेटपर्यंत झगडावे लागले होते, मात्र तिसऱया फेरीत त्याने सरळ सेटमध्ये विजय संपादन केला.

जर्मनीच्या कोलश्रेबरने ऑस्ट्रेलियाच्या जॉन मिलमॅनवर ७-५, ६-२, ६-४ असा विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाच्या सहाव्या मानांकित डोमिनिच थिएमने फ्रान्सच्या एड्रियन मानारिनोला ७-५, ६-३, ६-४ अशी धूळ चारून तिसऱयांदा अंतिम १६ मध्ये प्रवेश केला. थिएमची गाठ आता २००९ मधील चॅम्पियन अर्जेंटिनाच्या जुआन मार्टिन डेल पोत्रो याच्याशी पडेल. त्याने स्पेनच्या रोबर्टो बतिस्ता अगुटचा ६-३, ६-३, ६-४ असा पाडाव केला.