फेडरर, शारापोव्हाचे आव्हान संपुष्टात

सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क

सदाबहार टेनिसपटू रॉजर फेडरर आणि रशियन टेनिस सुंदरी मारिया शारापोव्हा या माजी ‘नंबर वन’ खेळाडूंचे मंगळवारी यूएस ओपन ग्रॅण्डस्लॅप स्पर्धेत चौथ्या फेरीतच आव्हान संपुष्टात आले. द्वितीय मानांकित फेडररला 55व्या मानांकित ऑस्ट्रेलियाच्या जॉन मिलमनने पराभवाचा धक्का दिला. दुसरीकडे शारापोव्हाला स्पेनच्या कार्ला सुआरेजने बाहेरचा रस्ता दाखविला.

जॉन मिलमनने स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररला चुरशीच्या लढतीत 3-6, 7-5, 7-5 (9/7), 7-6 (7/6) असे पराभूत करून उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. पाच वेळा यूएस ओपनचा करंडक जिंकणाऱ्या फेडररने पहिला सेट जिंकून झकास सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर जॉन मिलमनने जबरदस्त पुनरागमन करत 20 ग्रॅण्डस्लॅम पदकांचा राजा असलेल्या फेडररला परास्त करून सनसनाटी विजय नोंदविला. जॉनने टायब्रेकपर्यंत ताणलेले दोन सेट जिंकून बाजी मारली हे विशेष. यूएस ओपनमध्ये 50च्या बाहेरील क्रमवारीतील प्रतिस्पर्ध्याकडून पराभूत होण्याची फेडररची ही पहिलीच वेळ होय. फेडररने या लढतीत 77 सहज चुका केल्या, तर 10 दुहेरी चुका केल्या. आता उपांत्यपूर्व लढतीत जॉन मिलमनपुढे नोवाक जोकोविचचे कडवे आव्हान असेल. जोकोविचने एकतर्फी लढतीत बिगरमानांकित जाओ सोसा याचा 6-3, 6-4, 6-3 असा सेरळ सेटमध्ये धुव्वा उडवून आगेकूच केले.

महिला गटात 2006 ची चॅम्पियन असलेल्या मारिया शारापोव्हाला सलग दुसऱयांदा यूएस ओपनमध्ये उपउपांत्यपूर्व लढतीतच पराभवाची नामुष्की पत्करावी लागली. पाच वेळच्या ग्रॅण्डस्लॅम विजेत्या 23 व्या मानांकित शारापोव्हाला 30 व्या मानांकित कार्ला सुआरेजने 6-4, 6-3 असे सरळ सेटमध्ये पराभूत करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. जपानच्या नाओमी ओसाका हिने बेलारूसच्या एरिना स्बालेंका हिचा 6-3, 2-6, 6-4 असा तीन सेटमध्ये पराभव करून कारकीर्दीत प्रथम ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली.

सामना संपल्यावर दिलासा मिळाला!
लढतीदरम्यान कोर्टवर अतिशय उकाडा होता. अजिबात हवा नसल्याने मला श्वास घेतानाही त्रास होत होता. शिवाय घामाघूम झाल्याने मला असहाय्य झाले होते. त्यामुळे मी जरी हरलो असलो तरी सामना संपल्यावर मला दिलासा मिळाला.’
– रॉजर फेडरर