विद्यार्थ्यांवर दुप्पट परीक्षा फीवाढीचा बॉम्ब! लाखो गोरगरीब विद्यार्थ्यांना भुर्दंड

45

>> देवेंद्र भगत । मुंबई

राष्ट्रीय स्तरावरील दर्जेदार विद्यापीठांच्या रँकिंगमध्ये पहिल्या दीडशेमध्येही स्थान मिळाले नसलेल्या मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांवर थेट १०० टक्के परीक्षा फीवाढीचा बॉम्ब टाकला आहे. पदवी, पदव्युत्तर आणि एमफिल, पीएचडी अशा सगळ्या अभ्यासक्रमांसाठी ही फीवाढ लागू होणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून लाखो गोरगरीब विद्यार्थ्यांना याचा फटका बसणार आहे.

संलग्न महाविद्यालय प्रशासनांच्या दबावामुळे विद्यापीठ प्रशासन गेल्या काही वर्षांपासून फीवाढीचा प्रयत्न करीत आहे. मात्र विद्यार्थी संघटनांच्या प्रचंड विरोधामुळे विद्यापीठाची फीवाढ रखडली आहे. त्यामुळे विद्यापीठाने आता परीक्षा फीवाढीच्या माध्यमातून यावर तोडगा काढल्याचे बोलले जात आहे. यामध्ये बीए, बीकॉम, बीएसस्सी अशा पारंपरिक अभ्यासक्रमाची ५०० ते एक हजार रुपयांपर्यंत असणारी फी दोन हजार ते तीन हजारांवर जाणार आहे. दरम्यान, विद्यापीठाने काढलेल्या परिपत्रकानुसार काही महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून वाढीव फी वसूल केल्याचेही समोर आले आहे. यावर आलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने विद्यार्थ्यांकडून वाढीव फी पुढील वर्षांपासून घ्यावी आणि यावर्षी फक्त परीक्षा प्रक्रियेत काम करणाऱ्यांचे मानधन वाढवून द्यावे असे सुधारित परिपत्रकही काढले आहे.

प्रशासन म्हणते, खर्च वाढला

निकाल वेळेत लागावेत यासाठी विद्यापीठ ‘ऑन क्रीन मार्किंग’ पद्धत आणणार आहे. या पद्धतीने पेपर तपासणीसाठी तीन वर्षांपूर्वी प्रतिपेपर २८ रुपये खर्च येत होता. मात्र आता सर्वच पेपर कॉम्प्युटरवर तपासण्यात येणार आहेत. त्यामुळे हा खर्चही वाढणार आहे. यातच पेपर तपासणीसाठी मिळणाऱ्या तुटपुंज्या रकमेमुळे पेपर तपासायला प्राध्यापक मिळत नसल्यामुळे त्यांचेही मानधन वाढवण्यात येणार आहे. हा वाढवलेला खर्च भागवण्यासाठीच परीक्षा फीवाढ केल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले.

गेल्या अनेक वर्षांपासून विद्यापीठाची परीक्षा फी वाढवण्यात आलेली नाही. असे असले तरी परीक्षा प्रक्रियेचा खर्चही अनेक पटींना वाढला आहे. या पार्श्वभूमीवर हा परीक्षा फीवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. एक्झाम सुपरवायझर, पेपर तपासणीस यांचे मानधनही वाढवण्यात आले आहे. परीक्षा प्रक्रियेत काम करणाऱ्यांना मिळणाऱ्या मानधनात वाढ झाल्यामुळे निकाल वेळेत लागण्यास मदत होईल.
– डॉ. एम. ए. खान, कुलसचिव, मुंबई विद्यापीठ.

आपली प्रतिक्रिया द्या