महिला दिन विशेष-खेळ फक्त नोकरी मिळवण्यासाठी खेळू नका !

विठ्ठल देवकाते, पुणे

पुणे जिल्ह्यातील छत्रपती पुरस्कार विजेत्या महिला खेळाडूंचा गुरुवारी सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला राज्याचे क्रीडा संचालक नरेंद्र सोपल उपस्थित होते. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी खेळू नका, नोकरी लागली तरी सराव सुरु ठेवा. खेळाचे व्यसन लागले तरच आंतराष्ट्रीय पातळीवर चमकाल, असा सल्ला सोपल यांनी पुरस्कार विजेत्या महिला खेळाडूंना दिला.

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्ममाने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मागील तीन वर्षांचे शिवछत्रपती पुरस्कार रखडले होते जे नुकतेच देण्यात आले आहेत. त्यामुळे तीन वर्षांतील १६ महिला शिवछत्रपती पुरस्कारार्थी अणि दोन राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या महिला अशा १८ क्रीडारत्नांचा गौरव करण्यात आला. स्वाती गाढवे (अ‍ॅथलेटिक्स), शिरीन लिमये (बास्केटबॉल), ऋतुजा सातपुते (सायकलींग) या शिवछत्रपती पुरस्कारार्थी खेळाडू या गौरव सोहळ्याला उपस्थित राहु शकल्या नाही.

अध्यक्षीय भाषणात बोलताना नरेंद्र सोपल पुढे म्हणाले, खेळाडूंना सरकारी नोकरी देण्याबाबत समाजातल्या काही घटकांकडून नाराजी व्यक्त केली जाते. मात्र स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यापेक्षा राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर पदके मिळविणे अवघड आहे, असे स्पष्ट मतही त्यांनी व्यक्त केले.

या सत्कार सोहळ्यात ज्या महिला खेळाडूंचा गौरव करण्यात आला त्यांची नावे अशा प्रकारे आहेत.

सविता मराठे (मार्गदर्शक जिम्नॅस्टिक, थेट जिजामाता), गुरुबन्स कौर (जिजामाता), प्रिताली शिंदे (सायकलिंग), शिवानी शेट्टी (स्केटिंग), तेजश्री नाईक (ट्रायथलॉन), पूजा ढमाळ (हॅण्डबॉल), किशोरी शिंदे (कबड्डी), ऐश्वर्या रावडे (तायक्वांदो), ऋचा पाटील (अ‍ॅथलेटिक्स), श्रद्धा तळेकर (जिम्नॅस्टिक), स्नेहल वाघुले (हॅण्डबॉल), पूजा शेलार (कबड्डी), कोमल पठारे (तायक्वांदो). मेघा अगरवाल (धनुर्विद्या), आकांक्षा हगवणे (बुद्धिबळ), अबोली जगताप (तायक्वांदो), गौरी गाडगीळ (राष्ट्रीय दिव्यांग पुरस्कार), दीक्षा दिंडे (राष्ट्रीय युवा पुरस्कार).