आम्ही स्त्री कलाकार

मुलाखती…संजीवनी धुरी-जाधव

चित्रपटांत स्त्री भूमिका साकारणं तुलनेने सोपं असतं. पण प्रेक्षकांसमोर रंगभूमीवर अत्यंत यशस्वी ठरलेली रुबाबदार मोरुची मावशी…

 मावशीची जबाबदारी मोठी – विजय चव्हाण

‘मोरूची मावशी’ हे नाटक १ जानेवारी १९८५ रोजी रंगमंचावर आले होते. त्या काळात पुरुष स्त्री व्यक्तिरेखा साकारायचे नाही. कारण बायका या क्षेत्रात आल्या होत्या. एका स्पर्धेत हे नाटक केलं होतं. आम्ही ते सगळय़ांनी पाहिलं आणि नेमकं ते माझ्याकडे आलं. तरी मनात भीती होती. स्त्री व्यक्तिरेखा करायची थोडं जबाबदारीचे काम होतं. मी ते स्वीकारले आणि बायकांचे हावभाव निरीक्षण करायला लागलो. बसमध्ये त्या कशा उभ्या असतात. आपली साडी कशी सावरतात हे सगळे मी बसमध्ये प्रवास करताना पाहायचो आणि तिथेच बघून मी ‘मोरूची मावशी’ करायला लागलो. माझे बायकी हावभाव पाहून बायकांकडून बरेच लाफ्टर यायचे. मध्येच पुरुषी बोलायचो. मध्ये स्त्रीसारखा वागायचो.

मांजराची धमाल

काही वेळा खालून लोक चांगल्या कॉमेण्ट्स देतात. माझा प्रयोग होता. मी साडीमध्ये खुर्चीवर बसलो होतो आणि समोरून स्टेजवर मांजर आलं आणि माझ्या बाजूला येऊन बसले. ते मांजर माझ्याकडेच बघत असल्याने मी घाबरलो आणि संवाद बंद केले. खालून लोक हसत होते. मांजरीला हाकलवण्याचा प्रयत्न केला, पण ते जाईना. एक प्रेक्षक बोलला, ‘ए विजय, तुझी मावशी आली.’ प्रेक्षकही छान होते. त्याच्यावर प्रेक्षकांमधून टाळय़ा आल्या. मांजर बिथरलं आणि तिथून गेलं. नाटकातील मावशीच्या साडय़ा आमचे प्रोडय़ुसरच ठरवायचे. फक्त रंग मी सांगायचो.

नाटकातले ‘टांग टिंग टिंगा’ हे गाणं खूप प्रसिद्ध झालं होतं त्यात मी फुगडी, कोंबडा घालायचो. मला पहिल्या प्रयोगापर्यंत अंदाजच नाही की, त्या गाण्याला इतका प्रतिसाद येईल. नंतर नंतर तर लोकांमधून या गाण्यासाठी वन्स मोअर यायला लागले. मला थकायला व्हायचं. जाम दम लागायचा. मग आत जायचो. एक दम खायचो आणि पुन्हा करायचो. लोकं ऐकायचीच नाही इतका त्यांना तो नाच आवडायचा. मला चांगलं आठवतं, काही ठिकाणी हा प्रयोग झाला. पहिल्या रांगेत भक्ती बर्वे बसल्या होत्या. त्यांना ते गाणं खूप आवडलं. त्या माझ्याकडे आल्या आणि ‘काय नाचलात हो’ असे कौतुकही केले होते.

स्त्री व्यक्तिरेखा साकारताना साडी, पदर, आवाज आणि चालणे या गोष्टीकडे लक्ष ठेवले होते. मोरूच्या मावशीनंतर स्त्री भूमिकेविषयी ऑफर आली होती. पण मी ती नाकारली. जे काही होतं ते मोरूच्या मावशीमध्ये केलं. संपलं आता. पुन्हा त्यात नवीन काही मजा नाही. आता नाही पुन्हा मोरूची मावशी जमणार.

moruchi-mavshi-2

मोरूची मावशी पुन्हा येईल – भरत जाधव

सुरेश भट यांनी जेव्हा मला ‘मोरूची मावशी’ ही व्यक्तिरेखा करशील का असे विचारले तेव्हा मी लगेच तयार झालो. लगेच विजू मामांना फोन केला. करू का? विजू मामा बोलले, तूच करू शकतोस हे. कर.. कर.. मला बरे वाटेल. माझी मावशी सेफ राहील असे ते बोलले. त्यांच्या हस्ते शुभारंभ केला. विजू मामांनी मला खूप टिप्स दिल्या. साडी नेसायला आधी शिकवलं. कारण नाटकात वावरताना कधी साडी सुटली वगैरे तर ती बरोबर सावरता आली पाहिजे. त्यानंतर कसे चालायचे, बोलण्यात तो नाजूकपणा कसा आणायला हवा.

विजू मामांसारखी मावशी मी साकारूच शकणार नाही. कारण अशा व्यक्तिरेखा हुबेहूब नाही साकारता येत. पण त्याच्या जवळपास जाण्याचा मी प्रयत्न केला. त्याला क्रॉस करून आपण पुढे जाऊच शकत नाही. आचार्य अत्रेंचं लिखाण आणि त्यात विजू मामांनी केलेला रोल. तोही अतिशय गाजवलेला रोल. मोरूच्या मावशीबाबत विचारण्यात आलं तेव्हा मी पहिल्यांदाच स्त्री व्यक्तिरेखा स्टेजवर करणार होतो. त्यामुळे थोडं दडपण होतं. त्यामुळे माझ्यासाठी फार मोठे आव्हान होतं आणि त्याबरोबर जबाबदारी होती. पण त्यात विजू मामा सोबत होते. त्यामुळे काही अडचण आली नाही.

मी या व्यक्तिरेखेसाठी मजबूत तालमी केल्या. ‘मुळात माझा एक वेगळा प्रेक्षक आहे तो म्हणजे कुटुंबाने मला बघायला येणारे प्रेक्षक खूप आहेत. मी इव्हेंट, पाटर्य़ा या सगळय़ात पडत नाही. त्यामुळे त्या गोष्टीचे भान राखून काही गोष्टी करत असतो. त्यामुळे हे नाटक करताना लहान मुलांपासून आजोबापर्यंत कोणाच्या भावना दुखावणार नाहीत. कुठेही वल्गर वाटणार नाही. ती सोज्वळ कशी वाटेल देखणेपणा कुठेतरी कमी-जास्त होईल, पण तिची सोज्वळता कमी होता कामा नये. त्या बारीक बारीक गोष्टींचा फार विचार केला होता आणि त्यामुळेच विजू मामा दोन-तीन दिवस तालमीला येऊन शिकवत होते. चालण्यापासून पदर कसा सांभाळायचा इथपर्यंत दाखवत होते. पोट दाखवायचे नाही. पुरुषासारखं आपण चालतो मग आपलं पोट दिसतं. ते पोट चालताना कसे लपवशील. जेव्हा बायका समोर नसतील आणि पुरुषासारखे वागायचे असेल तेव्हा मग तू बिनधास्त पुरुषासारखा वाग. मला मोरूच्या मावशीसाठी विजय चव्हाणांचा खूप हातभार लागला. त्यांचं माझं टय़ुनिंग खूप जमलं. चाळीसेक चित्रपट मी त्यांच्यासोबत केले आहेत.

एक तर भट साहेब यांचे त्या दरम्यान निधन झाले होते आणि त्यात दोन पार्टनरच्या काही अंतर्गत अडचणींमुळे नाटक थांबवण्यात आले. नाटकाचे शो चांगले चालले होते. दौरे चांगले चालले होते. हे नाटक मधल्या काही गोष्टींमुळे हे नाटक थांबलं आहे. पण मी पुन्हा करेन.