वरुण धवनला महिला चाहतीने दिली आत्महत्येची धमकी

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूडमधील कलाकारांचे चाहते आपल्या आवडत्या कलाकाराला भेटण्यासाठी कुठल्याही थराला जायला तयार होतात. कधी कधी अशा चाहत्यांचा कलाकारांना त्रासही होतो. याचाच अनुभव बॉलिवूड अभिनेता वरुण धवनला देखील आला आहे. वरुणला त्याच्या एका महिला फॅनने चक्क व्हॉट्सअॅपवर रिप्लाय दिला नाही तर आत्महत्या करण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी वरुणने सांताक्रुझ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.

गेल्या काही दिवसांपासून एक महिला चाहती वरुणला व्हॉट्सअॅपवर सतत मेसेज पाठवत होती. तिला कंटाळून वरुणने तिचा नंबर व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केला होता. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी वरुणला एका मुलाचा निनावी कॉल आला. त्या मुलाने सदर महिलेले व्हॉट्सअॅपवरून अनब्लॉक कर नाहीतर ती आत्महत्या करेल अशी धमकी दिली. या धमकीमुळे घाबरलेल्या वरुणने थेट सांताक्रुझ पोलीस ठाणे गाठले आणि त्या महिलेवरोधात तक्रार दाखल केली.

‘वरुणला आलेल्या फोनचा नंबर व त्या महिलेच्या मोबाईल नंबरवरून आम्ही त्या मुलाचा व महिलेचा शोध घेत आहोत. लवकरच आम्ही त्यांना अटक करू. याप्रकरणात त्या दोघांविरोधात मानसिक त्रास देणे व आत्महत्येची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे.’ असे सांताक्रुझ पोलिस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.