राजधानीतील बॉम्बस्फोटाचा आरोपी उपराजधानीच्या कारागृहात

सामना प्रतिनिधी । नागपूर

महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी आणि फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेला दहशतवादी फिरोज खानला नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये हलवण्यात आले आहे. फिरोजला सध्या फाशी यार्डातील कोठडीत ठेवण्यात आले आहे. मात्र नुकताच नागपूरच्या कारागृहात एका कैद्याचा खून करण्यात आल्यामुळे कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

२४ वर्षांपूर्वी फिरोज आणि त्याचे साथीदार बॉम्बस्फोटानंतर फरार झाले होते. नंतर त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. फिरोजचे साथीदार अजगर मुकादम आणि अब्दुल गनी तुर्क हे दोघे नागपूरच्याच कारागृहात आहेत. आता २४ वर्षानंतर या कुख्यात दहशतवाद्यांची जेलमध्ये भेट झाली आहे. सोमवारी आयुष पुगलिया या कुश कटारिया अपहरण आणि हत्या प्रकरणातील दोषीचा जेलमध्येच खून करण्यात आला होता. देशभरातील अनेक कुख्यात दहशतवादी नागपूर सेंट्रल जेलमध्ये हलवण्यात आल्याने जेलची सुरक्षा वाढवण्याची मागणी होत आहे.