सण साजरे कराल, तर शरीरस्वास्थ्य टिकेल!

anupriya-desai-astrologer>>अनुप्रिया देसाई (ज्योतिष आणि वास्तू विशारद)

सर्वांना दिवाळीच्या खूपखूप शुभेच्छा. येणारे वर्ष तुम्हांला भरभराटीचे,आनंदाचे आणि आरोग्यदायी जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आजचा आपला विषय आहे आपले तिथीनुसार असलेले सण आणि आपले शरीर स्वास्थ्य. अनेकांना सण म्हणजे साजरे करणं म्हणजे परंपरावादी (Orthodox) वाटतं, अनेक जण सण साजरा करण्याऐवजी फिरायला जाणं पसंत करतात. फिरण्यास मनाई नाही पण सण साजरे करून फिरा. कारण हे सण-तिथी-निसर्गातील बदल आणि शरीरस्वास्थ यांचा घनिष्ट संबंध आहे. त्यावरच आजचा सविस्तर ब्लॉग, वाचून बघा पटतयं का?

gudhi-4

आपले जे सर्व सण आहेत त्या सर्वांना शास्त्राप्रमाणे काही अर्थ आहे हे नेहेमीच प्रतीत होत. हिंदू वर्षाची सुरवातच होते गुढीपाडव्यापासून. गुढीपाडवा ही तिथी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा. २१ मार्चला सूर्य विषुववृत्तावर येतो. ह्याच दिवशी भर दुपारी सूर्य बरोबर डोक्यावर येतो. त्याला वसंतसंपात म्हणतात. सूर्य बरोबर डोक्यावर म्हणजे पृथ्वीवरच्या तापमानात वाढ. तापमानात वाढ म्हणजे शरीरातून साखर आणि पाणी कमी होणे (glucose), अंगावर पुरळ उठणे. आपल्या गुढी उभारण्याच्या पद्धतीत कलशाबरोबरच आपण साखरेच्या गाठी आणि कडूलिंबाची पाने जरीच्या वस्त्राला माळतो. साखरेच्या गाठी शरीरातील glucose कमी होण्यावरचा आणि कडुलिंब अंगावर उठणाऱ्या पूरळांवरचा उपायच नाही का?

ह्या नंतर येणारा सण म्हणजे अक्षय्यतृतीया. गुढीपाडवा हा प्रतिपदा म्हणजेच चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जाणारा सण. तर अक्षय्य + तृतीया म्हणजे वैशाख महिन्याच्या तिसऱ्या दिवशी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नांगरलेल्या शेतजमिनीचे मशागत करण्याचे काम अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पूर्ण करायची प्रथा आहे. (मशागत म्हणजे नांगरलेल्या शेतजमिनीची साफसफाई करून खत मिश्रित मातीच्या थरांना खालीवर करणे.) या दिवशी मशागत केलेल्या जमिनीतील मृत्तिकेबद्दल कृतज्ञ भाव ठेवून काही शेतकरी पूजन केलेल्या मृतिकेमध्ये आळी घालतात. कोकणात या दिवशी शेतात बियाणे पेरण्याची प्रथा आहे, देशावर नाही. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बियाणे पेरण्यास सुरुवात केल्यास त्या बियाणांपासून विपुल धान्य पिकते व कधीही बियाणाला तोटा पडत नाही, अशी धार्मिक समजूत आहे. (बियाणे म्हणजे मळणीतील धान्य आपल्या आवश्यकतेनुसार खाण्यासाठी बाजूला काढून घेऊन पुढच्या पेरणीसाठी राखून ठेवलेले उरलेले धान्य.)

ह्या तिथीच्या दिवशी केलेले दान हे अक्षय्य म्हणजेच अबाधित राहते म्हणून ह्या तिथीला खूप महत्त्व आहे. अक्षय्यतृतीयेपासून उन्हाळा वाढत जातो म्हणूनच ह्या दिवशी वहाणा (चपला ) आणि छत्र्यांचे दान केले जाते. ह्या दिवशी कैरीचे पन्हे,खस किंवा वाळ्याचे सरबत पिणे आणि इतर गरीब लोकांना दान दिले जाते. आपल्या सणांचे महत्त्व तुम्हांला आता निश्चितपणे पटत असेल अशी आशा वाटते.

वट पौर्णिमेची पूजा
वट पौर्णिमेची पूजा

अक्षय्यतृतीयेनंतर येणारा सण म्हणजे वटपौर्णिमा. ज्येष्ठ महिन्याची पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा. वटपौर्णिमेचे “Scientific” महत्त्व मी या आधीच्या लेखात सांगितले होते. ही पौर्णिमासुद्धा वातावरण बदलत असतांना आरोग्य कसे राखावे ह्यासाठी महत्त्वाची ठरते. हवेतील ऑक्सिजन कमी होत असतांना घरातील स्त्रियांना ऑक्सिजनची सर्वात जास्त गरज असते. वडाच्या सानिध्यात ह्या दिवसांत जर वेळ व्यतीत केला तर शरीराला जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळतो. स्त्रिने तिच्या आरोग्याची जर काळजी घेतली तर संपूर्ण कुटुंब निरोगी राहण्यास मदत होते. तेंव्हाचे आपले पूर्वज किती पुरोगामी होते हे समजून येते. वडाचे झाड,त्याच्या पारंब्या,पाने,फुले ह्याच्या स्त्रियांच्या उदर आरोग्याशी घनिष्ठ संबंध आहे आणि म्हणूनच वटपौर्णिमेचे व्रत करण्यास सांगितले गेले. हे व्रत केल्याने नवऱ्याचे आयुष्य वाढते असे सांगितल्यास भारतीय स्त्रिया हे व्रत नेमाने करतील अशी आपल्या आयुर्वेदाचार्यांना हमी होती. धर्माच्या आडून आरोग्य राखण्याचा हा प्रयत्न.

ह्या पौर्णिमेनंतर आषाढी एकादशी येते. एकादशी म्हणजे महिन्याचा एकरावा दिवस. ह्या दिवशी वारकरी आपल्या आराध्य देवतेला भेटण्यास जातात. कारण ह्या दिवसानंतर विष्णू भगवान गाढ निद्रेत जातात अशी समजूत. खरंतर त्यानंतर शेतीची पेरणी आणि तत्सम कामे असल्यामुळे देव पूजा करता येत नाही ह्यासाठीच हे दर्शन महत्त्वाचे ठरते. त्यानंतर चार महिने चातुर्मास पाळला जातो. शेतकरी शेतीच्या कामात गढून जातो. म्हणून ह्या एकादशीला खूप महत्त्व आहे.

आषाढी एकादशीप्रमाणेच आषाढी अमावस्येलाही महत्त्व आहे. ह्या अमावास्येपासून चातुर्मास पाळला जातोच पण त्याच बरोबरीने मांसाहार करू नये असे सांगितले जाते. मांसाहार करू नये हे ह्याच कारणासाठी की पावसाळ्यात आपली पचनसंस्था मंदावलेली असते. मांसाहार पचण्यास जाड असतो. शाकाहारही ह्या काळात पचत नाही. तसंच प्राण्यांच्या प्रजोत्पादनाचा हा काळ आहे. म्हणून ह्या अमावास्येपासून मांसाहार केला जात नाही. हल्ली ही अमावस्या गटारी म्हणून ओळखली जाते. खरंतर “गटारी” हा अपभ्रंश आहे. त्याचा अर्थ आहे “गत -आहार ” पचनाची गती कमी झालेली असते म्हणून “गत आहार ” ह्या पुढे पचनास हलका असा आहार घ्यावा हा संदेश.

आषाढ संपून येतो श्रावण. श्रावण महिना आपल्याला शरीर स्वास्थ्यासाठी उपवास किंवा हलका आहार घेण्यास सुचवतो. अध्यात्मिक उन्नतीसाठी किंवा मन शांत राहण्यासाठी ह्या महिन्यात व्रत-वैकल्ये सांगितली गेली आहेत.
श्रावणातील पाचवा दिवस म्हणजे नागपंचमी.आपण नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करतो. मला आपल्या भारतीय संस्कृतीचा खूप अभिमान आहे कारण आपल्याला ज्या सर्व प्राणिमात्रांकडून मदत होत असते ते सर्व आपल्या शास्त्रात पूजनीय सांगितले गेले आहेत. साक्षात शिवशंकराने नाग गळ्यात परिधान केला आहे आणि भगवान विष्णू नागावर विश्राम करीत असतात. नागाची पूजा का करावी ह्याचे महत्त्व शहरी लोकांना नसेल परंतु शेतकरी कुटुंबियांना नक्कीच आहे. नागाला क्षेत्रपाळही संबोधले जाते. क्षेत्र म्हणजे -शेत आणि पाळ म्हणजे रक्षक. आपल्या शेतीचे उंदीर आणि इतर उपद्रवी प्राण्यांवर स्वतःची उपजीविका करतोच परंतु त्याच बरोबर आपल्या शेतीचेही रक्षण करतो. म्हणून हा कृतज्ञता दिवस पाळला जातो. श्रावण महिन्याची पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा. पावसाळ्यात समुद्राला आलेले उधाण आणि मस्त्य प्रजोत्पादनाचा काळ म्हणून कोळी बांधव सुद्धा मासेमारी करीत नाहीत. ह्या समुद्रापासून रोजगार मिळतो म्हणून समुद्राबद्दलचा आदर ह्यासाठी नारळी पौर्णिमेला समुद्रात नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे. हे अर्पण केलेले नारळ समुद्राच्या पाण्यातून वाहत जातात आणि किनाऱ्यालागत त्यांची पुन्हा नारळाच्या झाडांची लागत होते. मनुष्यवस्ती नसलेल्या ठिकाणीही नारळाच्या झाडांची लागत होते. ही धार्मिक सणाची मदत घेऊन केलेली वृक्ष लागवडच नाही का ? श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी म्हणजे आपल्या नटखट कृष्णाचा जन्मदिवस. कृष्णजन्मानंतरच्या दिवशी दहीहंडी साजरी होते. दूध,दही,लोणी(आजच्या भाषेत Proteins)हे शरीर स्वास्थ्यासाठी उपयुक्त आहेत आणि त्यातून मिळणाऱ्या प्रोटिन्समुळे शारीरिक क्षमता वाढते हेच तर सांगायचे नसेल ना कृष्णजन्म साजरा करण्यामागे ? ह्या अष्टमीला शेवग्याच्या पानांची भाजी नेवैद्य म्हणून केली जाते. शेवग्याच्या पानांमध्ये असलेले “क” जीवनसत्त्व हे शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे. वर्षभरातून एकदातरी “क” जीवनसत्त्व तुमच्या शरीरास मिळावे हा हेतू. ह्या अष्टमीनंतर येणारी श्रावण अमावस्या. श्रावण अमावस्या म्हणजेच पिठोरी अमावस्या. ह्या दिवशी घरातील चिमुकल्यांचे औक्षण करायचे. त्यांचे आरोग्य चांगले रहावे आणि त्यांना दीर्घायुष्य लाभावे म्हणून देवीची आराधना करतात.

श्रावण महिन्यानंतर येणाऱ्या भाद्रपद महिन्यात विद्येची देवता श्रीगणेशाची पूजा -अर्चना केली जाते. श्री गणेश विसर्जनानंतर आपल्या पूर्वजांच्या स्मृतीसाठी पितृपंधरवडा आहे. ह्या महिन्यातील अमावस्याही महत्त्वाची मानली गेली आहे. सर्व देवतांचे पूजन, पितरांची आठवण ह्यात श्रावण आणि भाद्रपद महिना संपतो.

अश्विन महिना हा खूप महत्वाचा ठरतो कारण पावसाळा आणि उन्हाळा संपून आता आपण थंडी अनुभवणार. मग आपण आपल्या शरीराची उत्तम काळजी घेतली पाहिजे. ऑक्टोबर उन्हाळा म्हणजे शरीरातील पित्त वाढणार. मग ह्या महिन्यांत कशी काळजी घ्यायची ते पहा- अश्विन महिन्याची प्रतिपदा हा दिवस “घटस्थापनेचा”. देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. ह्या नऊ दिवसांत मांसाहार नको किंवा शरीराला थंडावा प्रदान करतील असंच अन्न ग्रहण करावे हा संदेश. दहाव्या दिवशी “दसरा” साजरा केला जातो. आपल्यातील काम,राग,लोभ,मोह,मद आणि मत्सर ह्या रावणरूपी षडरिपुंवर विजय मिळवा असाच तर संदेश नाही ना द्यायचं आपल्याला ? ह्या महिन्यातील पौर्णिमा म्हणजेच “कोजागिरी पौर्णिमा”. आयुर्वेदाप्रमाणे ही पौर्णिमा आरोग्यदायी सांगितली गेली आहे. ह्या दिवसांत वातावरण बदलत असल्या कारणाने पोटाचे विकार वाढू शकतात.पोटदुखी,अपचन,पितप्रकोप होऊ शकतो. अशा वेळी आटीव दुधाचे सेवन म्हणजे पित्तावर हमखास उपाय. चंद्रकिरणे शीतल असतात. चंद्र किरणांचे अशा आटीव दुधात मिळून येणे म्हणजे दग्धशर्करायोगच नाही काय ? आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. मग ह्या पौर्णिमेचा उपयोग आपल्या आरोग्यासाठी का करू नये असाच तर विचार आपल्या पूर्वजांनी केला. काय पटतंय का मंडळी ? म्हणूनच ह्या दिवशी रात्री जागरण करून आटीव दूध म्हणजेच मसाले दूध चंद्राच्या किरणात ठेवावे. असे केल्याने दुधाची पित्त शमवण्याची शक्ती वाढते. मग दुधाची ताकद वाढवण्यासाठी कृत्रिम बोर्नव्हिटाची गरज भासत नाही.नुसतेच दूध ठेऊ नये तर स्वतःही चंद्रकिरणांत बसल्याने फायदा होतो.

घरातील स्त्रिया गाईच्या पायावर पाणी घालून, हळद, कुंकू, फुलं, अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. निरांजनाने ओवाळून गाईला केळीच्या पानावर पुरणपोळी खाऊ घालतात.
घरातील स्त्रिया गाईच्या पायावर पाणी घालून, हळद, कुंकू, फुलं, अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. निरांजनाने ओवाळून गाईला केळीच्या पानावर पुरणपोळी खाऊ घालतात.

अश्विन कृष्ण द्वादशी (बारावा दिवस ) म्हणजे “वसू बारस”. बारस म्हणजे बारावा दिवस. गाय आणि वासराची पूजा. आपल्या मुलाबाळांसाठी दूध देणाऱ्या गायची पूजा केली जाते. हा दिवस ह्या दोघांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा. ह्या महिन्यातील त्रयोदशी (तेरावा दिवस) म्हणजेच धनत्रयोदशी. धनाची पूजा करावी. धनाची पण कोणत्या ? बरेच लोक इथे गल्लत करतात की धनत्रयोदशी म्हणजे लक्ष्मीची पूजा /आपल्याकडील संपत्तीची पूजा. आपल्या पूर्वजांना शरीर संपत्तीची पूजा संबोधित करायची आहे. हे शरीर स्वस्थ असले म्हणजे आपण सुखी. म्हणून ह्या धनसंपताची काळजी घ्या हा संदेश. ह्या त्रयोदशीनंतर येते चतुर्दशी. अश्विन महिन्यापासून थंडीला सुरवात झालेली असते. त्वचा कोरडी पडू लागते. त्वचेला स्निग्धतेची गरज असते. म्हणूनच ह्या दिवसापासून अभ्यंग स्नान करावे असे सांगितले गेले आहे. तेलाने मर्दन करून उटणे लावून कोमट पाण्याने आंघोळ करावी. ह्या मौसमातील ह्या दिवशी केलेले अभ्यंग स्नान म्हणजेच पहिली आंघोळ. आजची पिढी मला विचारते “पहिली आंघोळ म्हणजे काय ? वर्षभर आपण आंघोळ करतोच की”. आपल्या अशी सणांची टर उडवण्यापेक्षा आपले आयुर्वेदशास्त्र किती “परफेक्ट” आहे हे जाणून घ्या म्हणजे ह्या दिवसांत डॉक्टरांकडे जाणे टाळता येईल. चतुर्दशी नंतर येते अमावस्या. खगोलीय दृष्ट्या जेव्हा सूर्य आणि चंद्र एकाच राशीत येतात किंवा पृथ्वीवरून पाहतांना चंद्र सूर्याच्या जवळ असतो. त्यामुळे सूर्याबरोबरच तो संध्याकाळी मावळतो. म्हणून अमावास्येला चंद्र आकाशात दिसत नाही. ज्योतिष-शास्त्रीय दृष्ट्या अमावस्या महत्वाची कारण सूर्य आणि चंद्र ह्या दिवशी एकत्र असतात. ह्या दिवशी तेला-तुपाचे दिवे लावून मनातील आणि आजूबाजूच्या परिसरातील अंधःकार दूर करण्याचा हेतू. ह्या दिवशी “लक्ष्मीपूजन” केले जाते. इथे लक्ष्मी म्हणजेच घरातील स्त्रियांचे आरोग्य आणि आयुष्य स्थिर रहावे म्हणून सजकता दाखवा हा संदेश.

laxmi-pujan

लक्ष्मीपूजनानंतर म्हणजेच अमावस्येनंतर कार्तिक महिना सुरु होतो. कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच पाडवा. व्यापारीबंधूंचे नवीन “Financial Year ” सुरु होते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा केलेल्या चोपडीत ह्या दिवसापासून नवीन हिशोब लिहायला सुरवात केली जाते. पाडवा आणि भाऊबीज. भाऊबीजेला भाऊरायाचे औक्षण करून त्याचे आयुष्य वाढावे, त्याने यशप्राप्ती करावी ही प्रार्थना करायाची असते. औक्षणाला सुद्धा शास्त्रीय महत्त्व आहे. पुढच्या वेळेस ह्यावर नक्की लिहीन. कार्तिक महिन्यात विष्णूला निद्रेतून उठवले जाते. आषाढी एकादशी हा दर्शनाचा शेवटचा दिवस असतो. चार महिने चातुर्मास पाळला जातो. आणि आता चार महिन्यानंतर विष्णूला निद्रेतून उठवण्याची तयारी. तुळशीच्या लग्नाचा हाच तो हंगाम. तुळस आपल्या आरोग्यासाठी संजीवनीच. ह्या मौसमात तुळशीचे सेवन करावे म्हणून तुळशीची पूजा आणि तिचे लग्न विष्णूशी करून दिले जाते. तुळस फोफवावी हा उद्देश. आणि ह्यामुळे घराघरात तुळशीची लागवड होते. तुळशीच्या आसपास रोगसंक्रामक विषाणूंचे प्रमाण कमी असते. आहे की नाही आपले आयुर्वेद महान. आयुर्वेदाप्रमाणे काही औषधी रोपटींची लागवड ही ठराविक तिथीला केल्यास तिची वाढ चांगली होते. तुळशीच्या बाबतीत असे काहीसे असावे असे वाटते. (ह्यावर संशोधन असल्यास कळवावे ). ह्या महिन्यातील पौर्णिमा “त्रिपुरारी पौर्णिमा” म्हणून साजरी केली जाते. ह्या दिवशी हिंदूची दोन तत्वे -शिव आणि विष्णू रात्री एकत्र येतात असा समज आहे. किंबहुना मलातरी असे वाटते की आपल्या शरीरातील चंद्रनाडी(शिवतत्व ) आणि सूर्यनाडी (विष्णूतत्व )ह्यांच्याशी हा संबंध असावा. शिवाचा प्रथम पुत्र “कार्तिकेयाचे” दर्शन ह्या दिवशी स्त्रिया घेऊ शकतात.

जानेवारी महिना सुरु झाला की पौष महिना सुरु होतो. ह्या महिन्यातील सूर्याचे भ्रमण मकर राशीत होत असते. ह्या दिवसापासून उत्तरायण सुरु होते. थंडीचा सोस असतो. त्वचेला तेलाने मर्दन आणि अभ्यंगाची गरज तर असतेच परंतु शरीराचे स्वास्थ्य तिळाच्या पदार्थानी जपले जाते. तिळाच्या वड्या,लाडू इ. पदार्थांचे सेवन केले जाते. ह्या दिवशी पतंग उडवणे हा सण साजरा केला जातो. उन्हात थोडी शारीरिक कसरत व्हावी हा उद्देश.

ह्या नंतर माघ महिन्यातील कृष्ण चतुर्दशी म्हणजेच “महाशिवरात्री”. ह्या दिवशी शिव तत्व हजारो पटींनी कार्यरत असते. ह्याच महिन्यात वातावरणात एक बदल येऊ पहात असतो. थंडीच्या मौसमातून हळूहळू वातावरणात गरमी वाढू लागलेली असते. त्यामुळे पचनाच्या क्रियेत बदल होत असतांना आपल्याही आहारात तो बदल आणावा हे संदेश.ह्या महिन्यात थोडा उपवास करावा,फलाहार करावा.

फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होलिकेचे दहन केले जाते. ह्या दिवशी आपण “होळी पौर्णिमा “साजरी करतो. मला नेहमी हा प्रश्न विचारला जातो की होळी पौर्णिमेला झाडे तोडून,फांद्या तोडून दहन केले जाते मग वृक्षलागवडीचा फायदा तो काय ? ह्या प्रश्नाचे उत्तर असे आहे की पावसाळ्यात अनेक अनावश्यक रोपटी,झुडपे वाढलेली असतात. शरदऋतूत ही झुडपे,रोपटी वाळून गेलेली असतात. नारळाच्या पानांच्या सुकलेल्या झावळ्या असतात . होळी पौर्णिमेला ह्या गोष्टींचे दहन केले जाते परिणामी परिसर साफ होतो. दुसऱ्या दिवशी “धुळवडीला” म्हणजे रंग फासायची प्रथा लागू झालेली आहे. परंतु आपल्या पूर्वजांना ह्या “धूळवाडीतून” हा संदेश द्यायचा आहे की उन्हाळ्याचा प्रकोप वाढीस लागणार आहे. त्वचेसंदर्भातील संसर्ग ( skin infection/irritation ) होण्याचा संभव असतो. म्हणून आपल्या मातीतील मिनरल्स (Minerals ) चे त्वचेवर छान लेपण करावे. ( जॉर्डनमध्येही dead sea मध्ये अंघोळ केली जाते ).

पहा आपली शास्त्रे किती प्रगत आहेत. प्रत्येक सण,प्रत्येक महिन्याची तिथी आणि आपले शरीरशास्त्र ह्यांची सांगड घालून आपल्याला वर्षभराचा “Diet Plan ” दिलेला आहे.त्याचे व्यवस्थित पालन केले तर प्रत्येक ऋतूबदलतांना डॉक्टरकडे जाण्याची वेळ येणार नाही. हल्ली जरा वातावरणांत बदल झाला की पडले आजारी आणि गेले डॉक्टरकडे असे चित्र दिसते. ह्याचे कारण आपण आपल्याला शास्त्रात सांगितलेल्या गोष्टींचा अवलंब करीत नाही. बघा एकदा विचार करून. एक वर्षंतरी ह्याचे पालन करून पहा. experiment करून बघायला काय हरकत आहे ?

आपल्या सणांबद्दलचा हा लेख आपला दृष्टिकोन नक्की बदलेल ही आशा.
आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा: [email protected]