मराठी मातीत रुजतोय…फुटबॉल

जयेंद्र लोंढे

फुटबॉल जगातील लोकप्रिय खेळ… आज मुंबईत, महाराष्ट्रात रुजू पाहतोय… फिफा विश्वचषकाच्या निमित्ताने या खेळात महाराष्ट्रातील खेळाडूही पुढे येत आहेत… चला तर अनुभवूया फुटबॉलची वेगवान नशा…

फुटबॉल अत्यंत वेगवान खेळ. आपल्या लक्ष्याचा पाठलाग करायला हा खेळ आपल्याला शिकवतो. आज क्रिकेट खेळ इथल्याच मातीतला झाला आहे. पण ते भाग्य अजून अस्सल देशी खेळांनाही लाभलेले नाही.

खूप पाऊस झाला की मैदानातील मऊ चिखलात फुटबॉल खेळणारी मुलं दिसतात. त्याक्षणी मनःपूत धावण्याचे स्वातंत्र्य देणारा हा खेळ वाटू लागतो. आता हळूहळू फुटबॉल आपल्याकडे रूजतोय. आपल्याकडे फुटबॉल रूजू शकला नाही. याची वेगवेगळी कारणे सांगितली जातात. एक अत्यंत चुकीचा समज म्हणजे हा खूप महागडा खेळ आहे.

फुटबॉल हा माझ्यासाठी गरीब लोकांचा खेळ आहे. फुटबॉलमध्ये काही साहित्य लागत नाही, कसला खर्च करावा लागत नाही आणि तो नेहमीच गरीब मुलांचा खेळ राहिला आहे. पूर्वी कचऱयापासून किंवा प्लॅस्टिकच्या पिशव्यांना रबर बांधून त्याचा बॉल तयार करून फुटबॉल खेळला जायचा. असेच खेळाडू पुढे जाऊन स्टार झाले. कारण या खेळात संधी ओळखणे खूप महत्त्वाचे असते. जी मुलं या खेळात पुढे जातात ती खरं तर गरीब कुटुंबातील असतात. त्यांच्यात शिकण्याची धमक असते.

प्रत्येक खेळात ‘सचिन’ पाहिजे. कारण आंतरराष्ट्रीय पातळीवर विजय मिळवतो तो मुलांसाठी आदर्श ठरतो. हिंदुस्थानचा बायच्युंग भुतिया, अनिकेत जाधव, निखिल कदम यांची नावं घेतली जातात, पण एक टीम म्हणून आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगिरी करू शकलेलो नाही. आशिया लेव्हलपर्यंतही आपला रँक चांगला नाही. पायाभूत सुविधा नाहीत, प्रशिक्षित कोच नाहीत, फिजिओथेरपिस्ट, ट्रेनर, मेडिकल स्टाफ, कोचिंग स्टाफ यामध्ये हवे तेवढी गुंतवणूक झालेली नाहीय. या खेळाकडे शासनाने लक्ष केंद्रित करायला हवे.

सराव आणि आहार गरजेचा

फुटबॉल हा खेळ फार रंजक असतो. तुम्ही गोल कधी करणार, कोणती टीम कधी जिंकणार, तुम्ही कसे परफॉर्म करणार याची हमी कधीच नसते. त्यामध्ये खेळाडूंचा समन्वय महत्त्वाचा असतो. अन्य खेळांपेक्षा हा थोडा वेगळा खेळ आहे. त्यामुळे जे नवीन विद्यार्थी आले आहेत त्यांना दोन गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे. एक म्हणजे सराव आणि दुसरी गोष्ट म्हणजे आहार. या दोन्ही गोष्टींकडे लक्ष केंद्रित करायचे आहे. हे वेळेवर केले तर आरामही नक्कीच मिळेल. मुलांना सतत हातात मोबाईल लागतो. त्यामुळे झोपेकडेही दुर्लक्ष होते. त्यामुळे आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे या दोन्ही गोष्टी खेळाडू मुलांनी त्यांच्या या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे.

कोल्हापूरची मुलं बघा. खूप हुशार असतात. मुलंच नाही तर मुलीही हुशार असतात. जे हा खेळ खूप चांगल्या प्रकारे खेळतात. फुटबॉलसाठी जे वातावरण जी मानसिकता लागते ती आपल्याकडे नक्कीच आहे. मी महिला फुटबॉलर पाहिल्या. महाराष्ट्राबरोबर मणिपूरपासून चेन्नईपर्यंत महिला फुटबॉलर आहेत. त्या खेळात मानसिकदृष्टय़ा कणखर आणि खूप हुशार आहेत, मुळात आपल्याकडे योग्य मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक नाहीत. जर योग्य मार्गदर्शन मिळाले तर नक्कीच

रांगडे गडी दिसणारे कोल्हापूर कुस्तीपटूंचे शहर अशी ओळख आहे. इथल्या लाल मातीत अनेक खेळाडू तयार झाले आहेत. पण याच लाल मातीत फुटबॉल खेळाडू जन्माला आले. कोल्हापूरला कुस्तीप्रमाणेच फुटबॉलचाही इतिहास आहे. कोल्हापूरचे छत्रपती राजाराम महाराज यांनी या शहरात ८७ वर्षांपासून फुटबॉल खेळाचे बीज रोवले. कोल्हापूरकरांना फुटबॉलचे मोठे वेड आहे. इथे गल्लीबोळात हा खेळ खेळला जातो. कोल्हापूरला फुटबॉलची फार मोठी परंपरा आहे. तरुणांमध्ये या खेळाची लोकप्रियता वाढत आहे. कोल्हापुरात फुटबॉलची होणारी गुणात्मक आणि संख्यात्मक वाढ नक्कीच कौतुकास्पद आहे. फुटबॉलचे एकीकडे कौतुक होत असताना काहीवेळा त्याला गालबोट लागत आहे. कोल्हापूरचे खेळाडू तंदुरुस्त असले तरी त्यांच्या फिटनेसकडे लक्ष द्यायला हवे.

हा असा खेळ आहे जो अनवाणी पायाने खेळला जातो. खेळण्यासाठी शूज महत्त्वाचे असतात. फुटबॉलची सुरुवात घरातूनच होत असते आणि नंतर मैदानात होत असते. तेव्हा अनवाणी पायानेच सुरुवात केली जाते. हा खेळ खेळण्यासाठी टीशर्ट आणि शॉर्ट पॅण्ट लागते आणि शूज तीनशे रुपयाचे घ्या किंवा तीस हजार रुपयांचे घ्या, पण या सगळ्यात महत्त्वाचे असते ते खेळाडूचे कौशल्य… म्हणजे या वयात मुलांना रंग, ब्रॅण्ड याचे आकर्षण असतेच, पण त्याबरोबर तुम्ही किती चांगले खेळता हे महत्वाचे असते. त्यामुळे मुलांनी केवळ खेळाकडे लक्ष देणे गरजेचे असते. एक चांगला खेळाडू त्याच्याजवळ असलेल्या साहित्याने मोठा होत नाही तर त्याच्यातील कौशल्यामुळे मोठा होतो.

फुटबॉल हा जगातील नंबर वन खेळ. हिंदुस्थानात मात्र कोलकाता, गोवा, केरळ, ओडिशा, नॉर्थ ईस्ट वगळता इतरत्र या खेळाचा प्रभाव दिसत नाही. मात्र युवासेना प्रमुख, मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने मुंबईतील फुटबॉलचा कायापालट होताना दिसत आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील कानाकोपऱयात फुटबॉलचा फिव्हर दिसू लागला आहे. महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड, अव्वल दर्जाच्या स्पर्धा, सर्व सोयीसुविधा असलेली व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्टेडियम्स या बाबींमुळे दिग्गज क्रिकेटपटू दिलेल्या या मुंबापुरीतून भविष्यात अव्वल दर्जाचे फुटबॉलपटूही निर्माण होतील यात शंका नाही. याची सुरुवात अनिकेत जाधवपासून झालीय. ऑक्टोबर महिन्यात हिंदुस्थानात आयोजित करण्यात येणाऱया फिफा १७ वर्षांखालील वर्ल्ड कपमध्ये कोल्हापूरच्या मराठमोळ्या खेळाडूने राष्ट्रीय संघात धडक मारत आपल्या महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले आहे…

मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनकडून मुंबापुरीत अव्वल दर्जाच्या स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. एलिट, सुपर डिव्हिजन, फर्स्ट, सेंकड व थर्ड डिव्हिजन या स्पर्धांमध्ये फुटबॉलपटू आपली चमक दाखवतात. एवढेच नव्हे तर मुंबईतील मुलींना फुटबॉलकडे आकर्षित केले जात आहे. महिलांच्या फुटबॉल लीगचेही यशस्वी आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी भविष्यात जागतिक स्तरावर मुंबईच्या मुली चमकू लागल्या तर आश्चर्य वाटायला नको.

कोल्हापूरचा अनिकेत जाधव वर्ल्ड कपमध्ये देशासाठी खेळणार

मुंबईत फुटबॉलला सुवर्ण झळाळी मिळत असतानाच महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या अनिकेत जाधव या मराठमोळ्या खेळाडूने थेट हिंदुस्थानी संघात धडक मारत आनंदात आणखी भर टाकली. वडील अनिल जाधव यांनी आपल्या मुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र रिक्षा चालवत प्रचंड मेहनत केली. हिंदुस्थानच्या अंतिम ५० संघांत निवड झाल्यानंतर परदेशातील सामन्यांमध्ये अनिकेत जाधवने शानदार कामगिरी केली आणि फिफा १७ वर्षांखालील वर्ल्ड कपसाठी हिंदुस्थानचे तिकीट बुक केले. वडिलांच्या कष्टाचेही चीज केले. आता वर्ल्ड कपमध्ये संस्मरणीय कामगिरी करण्यासाठी त्याचे हात शिवशिवत आहेत. कुटुंबीयांनी केलेले अपार कष्ट, मोलाची मदत याची परतफेड त्याला करावयाची आहे. सोबत देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर दिमाखात चमकवायचेय…

मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनकडून महापालिका शाळांतील मुलांच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. हिंदुस्थानात ६ ते २८ ऑक्टोबर या दरम्यान फिफा १७ वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात येत आहे. यातील काही सामने नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियम्समध्ये रंगणार आहेत. या सामन्यांचा आनंद महापालिका शाळांतील मुलांनाही घेता येणार आहे. त्यांना मोफत पासेस दिले जाणार आहेत. तसेच लवकरच १४ व १६ वर्षांखालील मुले व मुलींसाठी स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. शिवाय गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी स्पेशल कॅम्पचीही योजना आहे. यामध्ये अफाट गुणवत्ता असलेल्या खेळाडूंची निवड करून त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जेणेकरून त्यांना पुढे लीग, राज्य, राष्ट्रीय स्तरावर खेळता येईल. तसेच महापालिका शाळांतील मुलांना फुटबॉलसह खेळ, फिटनेस, आरोग्य याबाबतीतही धडे देण्यात येत आहेत.

मुंबईकर फुटबॉलपटूंना गेल्या काही महिन्यांत हक्काचे स्टेडियम्स उपलब्ध होऊ लागले आहेत. याआधी कूपरेज या कुलाब्यातील स्टेडियममध्ये हा खेळ जास्तीतजास्त रंगायचा. पण आता अंधेरीतील मुंबई फुटबॉल अरीना, परेल येथील सेंट झेवियर्स ही स्टेडियम्सही आकाराला आली आहेत. अंधेरीत तर आयएसएलपासून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सामन्यांचेही आयोजन करण्यात आले. सेंट झेवियर्स मैदानात महापालिकेच्या सहाय्याने फ्लडलाईटस् लावण्यात आले आहेत. लवकरच वांद्रे येथील नेव्हील डिसोझा येथेही मुंबईकरांचा दमदार खेळ पाहायला मिळेल. आणखी एका आंतरराष्ट्रीय स्टेडियमच्या उभारणीसाठीही प्रयत्न करण्यात येत आहे. एकूणच काय तर मुंबईतील युवा खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखवण्यासाठी भक्कम व्यासपीठ उपलब्ध होत आहे.