हिंदुस्थान आमच्या घराप्रमाणेच, अमेरिकेचे प्रशिक्षक जॉन हॅकवर्थ यांचे उद्गार

सामना प्रतिनिधी, नवी मुंबई

नवी दिल्लीतील उकाडा आणि नवी मुंबईतील पाऊस अशा भिन्न वातावरणाशी समन्वय जुळवून घेताना अडचण येते का, असा प्रश्न पत्रकारांकडून विचारला असता अमेरिकन फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक जॉन हॅकवर्थ म्हणाले, फुटबॉल वर्ल्ड कपसाठी प्लोरिडा येथे आम्ही कसून सराव केलाय. तेथील वातावरण हिंदुस्थानप्रमाणेच आहे. त्यामुळे हिंदुस्थानात आम्हाला घरच्या मैदानावर खेळल्याप्रमाणेच वाटते. अमेरिका व कोलंबिया यांच्यामध्ये उद्या नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये लढत होणार असून पूर्वसंध्येला जॉन हॅकवर्थ यांच्याशी संवाद साधला.

सोप्या आव्हानासाठी पहिले स्थान महत्त्वाचे
पहिल्या दोन्ही लढती जिंकून ‘अ’ गटामध्ये अव्वल स्थानावर असलेल्या अमेरिकेला अखेरच्या साखळी फेरीच्या लढतीतही जिंकायचे आहे. जॉन हॅकवर्थ यावेळी म्हणाले, अव्वल स्थानावर राहिल्यास पुढल्या फेरीत थोडेसे कमकुवत आव्हान आमच्यासमोर असेल. तसेच दोन सामन्यांमधील विश्रांतीही अधिक मिळेल. याचा फायदा आमच्या फुटबॉलपटूंना होईल, असेही ते न विसरता म्हणाले.

नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये उद्या दोन लढती रंगणार आहेत. तुर्की व पॅराग्वे या ‘ब’ गटातील संघांसोबतच अमेरिका व कोलंबिया हे ‘अ’ गटातील संघही या स्टेडियममध्ये एकमेकांना भिडणार आहेत. आदल्या दिवशी २००, ४०० व ८०० रुपयांची तिकिटे विकत घेण्यासाठी बॉक्सऑफिसवर थोडीफार गर्दी दिसली. त्यामुळे उद्या होणाऱ्या लढती पाहण्यासाठी शाळा-महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसोबत फुटबॉलप्रेमीही हजेरी लावतील यात शंका नाही.

फोकस फक्त विजयावरच
अमेरिकन संघाने पहिल्या दोन लढतींत विजय मिळवला असल्यामुळे आमचा संघ उद्याच्या लढतीत दबावाखाली खेळेल असे होणार नाही. आम्ही विजयावरच फोकस ठेवणार आहोत, असे स्पष्ट मत कोलंबियाचे मुख्य प्रशिक्षक ओरलॅण्डो रेस्टरेपो यांनी याप्रसंगी व्यक्त केले. तसेच हिंदुस्थानातील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी १५ दिवस आधीच येथे आलो होतो. त्यामुळे ऊन-पावसाच्या खेळाचा फरक जाणवत नाही, असेही ते यावेळी म्हणाले.
– ओरलॅण्डो रेस्टरेपो (प्रशिक्षक, कोलंबिया)