रशिया, उरुग्वेची आगेकूच

सामना ऑनलाईन, रोस्टोव

फिफा वर्ल्ड कपच्या ‘अ’ गटातून यजमान रशिया व उरुग्वे या संघांनी पुढल्या फेरीत अर्थातच अंतिम १६मध्ये रुबाबात धडक मारली. एकीकडे रशियाने मंगळवारी मध्यरात्री इजिप्तला ३-१ अशा फरकाने धूळ चारल्यानंतर दुसरीकडे उरुग्वेने बुधवारी सौदी अरेबियाला १-० असे पराभूत करीत आगेकूच केली. रशिया व उरुग्वे यांनी प्रत्येकी दोन विजयांसह सहा गुणांची कमाई केली आणि ‘अ’ गटातून पुढे पाऊल टाकले. इजिप्त व सौदी अरेबियाचे या स्पर्धेतील आव्हान साखळीतच संपुष्टात आले.

लुईस सुआरेझने २३ व्या मिनिटाला गोल करीत उरुग्वेला सौदी अरेबियावर विजय मिळवून दिला. तीन वर्ल्ड कपमध्ये गोल करणारा लुईस सुआरेझ हा उरुग्वेचा पहिलाच फुटबॉलपटू ठरलाय. उरुग्वे व सौदी अरेबिया यांच्यामधील लढतीत दोन्ही संघांतील खेळाडूंनी चांगला खेळ केला, पण लुईस सुआरेझच्या गोलने दोन संघांतील फरक स्पष्ट झाला.

यजमान सुसाट

उद्घाटनाच्या लढतीत सौदी अरेबियाची ५-० गोलफरकाने दाणादाण उडविणाऱ्या यजमान रशियाने फिफा वर्ल्ड कपमध्ये सलग दुसऱ्या रुबाबदार विजयाची नोंद केली. ‘अ’ गटातील लढतीत रशियाने इजिप्तला ३-१ गोलफरकाने हरवून बाद फेरीत प्रवेश केला. फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये रशियाचा हा पहिलाच सलग दुसरा विजय होय. रशियाने दोन सामन्यांत तब्बल आठ गोल मारले आहेत. आठ गोलसह रशियाने पहिल्या दोन सामन्यांत नोंदविलेल्या सर्वाधिक गोलची बरोबरी केली. या आधी १९३४ साली इटलीने आठ गोल केले होते. सलग दुसऱ्या या पराभवामुळे इजिप्तचा या स्पर्धेतील खेळ खल्लास झालाय.

आजच्या लढती

डेन्मार्क वि. ऑस्ट्रेलिया (सायं. ५.३० वा.)
फ्रान्स वि. पेरू (रात्री ८.३० वा.)
अर्जेंटिना वि. क्रोएशिया (रात्री ११. वा.)