पंधरा जण हद्दपार : 40 जणांना अटीशर्तींवर मुभा – उपविभागीय दंडाधिकारी गाडेकर

50

सामना प्रतिनिधी । नगर

नगर येथील लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या हेतूने प्रातांधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी मतमोजणीच्या कालावधीसाठी कोतवाली, तोफखाना हद्दीतील 15 जणांना शहराबाहेरचा रस्ता दाखवीत हद्दपार केले. तर 40 जणांना वीस हजार रुपयांचा जातमुचलका, तसेच अटी व शर्ती लादून शहरात राहण्याची मुभा दिली आहे. हे आदेश काल मंगळवार दि. 21 रोजी प्रांताधिकारी गाडेकर यांनी जारी केले आहेत.

17 व्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आहे. उद्या गुरुवार दि. 23 रोजी एमआयडीसी येथील वखार महामंडळाच्या गोदामात नगर, शिर्डी या दोन्ही लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने कारवाईची पावले उचलली आहेत. या अनुषंगाने तोफखाना व कोतवाली पोलिस ठाण्यांकडून संशयास्पद व्यक्तींवर कारवाईचे प्रस्ताव नगर प्रांत कार्यालयाकडे सादर करण्यात आले होते. यापैकी कोतवाली पोलिसांकडील 26, तर तोफखाना पोलिसांकडून 29 संशयित व्यक्तींविरोधात कारवाई करण्याचा प्रस्ताव नगर प्रांताधिकार्‍यांनी ग्राह्य धरले. कोतवाली हद्दतील सात व तोफखाना हद्दीतील आठ अशा एकूण पंधरा व्यक्तींना मतमोजणी कालावधीसाठी शहरातून हद्दपार करण्यात आले. कोतवाली व तोफखाना मिळून 40 जणांना 20 हजारांचा जातमुचलका आणि अटी, शर्तीवर शहरात राहण्याची मुभा प्रांताधिकारी गाडेकर यांनी दिली आहे.

या कारवाईबाबत माहिती देताना नगर प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर म्हणाल्या, लोकसभा निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या हेतूने प्राप्त अधिकाराचा वापर करीत 15 जणांना हद्दपार केले आहे. तसेच 40 जणांना अटी व शर्तीवर शहरात मुभा दिली आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड विधान संहिता कलम 188 नुसार कारवाई केली जाईल. तसेच जातमुचलक्याची 20 हजार रुपये वसूल करीत गन्हे दाखल केले जातील, असा इशारा प्रांताधिकारी गाडेकर यांनी दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या