सक्षम मी !

54

<< मेधा पालकर>>

मराठवाड्याला  चार वर्षांपासूनचा दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करणारा शेतकरी, मुलीचं लग्न करण्यासाठीही पैसा नसल्याने उद्विग्न झालेले वडील आणि आपल्या वडीलांवरील ओझं कमी करण्यासाठी जगाचा निरोप घेणारी मुलगी… नुकत्याच घडलेल्या शीतल वायाळ हिच्या आत्महत्येने पुन्हा एकदा हुंडाबळीच्या प्रथेने डोकं वर काढलं आणि सगळयांचेच डोळे उघडले. आता जरी ‘मी हुंडा देणार नाही, हुंडा घेणार नाही’ असे बोलले जात असले तरी, ते प्रत्यक्षात आणण्याची मानसिकता स्वीकारायला हवी. मुलींनी हुंडा देणार नाही असे म्हणतानाच २००३ साली झालेल्या कायद्यानुसार त्यांना ‘प्रॉपर्टीमध्ये हक्क द्या’ या कायद्याचे पालन झाले तरच हुंडाबळी आटोक्यात येईल असे मत सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या तज्ञांचे म्हणणे आहे.

ग्रामीण भागात मुलगी सांभाळणं हे आई-वडिलांसाठी सर्वात मोठं जबाबदारीचं काम आहे. त्यामुळे लवकरात लवकर तिचं लग्न लावून देऊन जबाबदारीतून मुक्त होण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पण त्यांनी तिला त्यांच्या ऐपतीप्रमाणे शिकविले, तर शिकलेली मुलगी लग्नात हुंडा द्यायला तयार नसते. काही ठिकाणी प्रतिष्ठेसाठी हुंडा दिला जातो. बडेजाव, खर्चिक लग्नांपेक्षा साध्या लग्नाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. ही इच्छा प्रत्येक आई वडिलांनी ठेवली, तर हुंडाबळी होणार नाहीत. सासरची मंडळी मुलींना चांगली वागणूक देतील.

आपली प्रतिक्रिया द्या