भाजप नगराध्यक्षांचे पती आणि माजी भाजप नगरसेवकामध्ये धक्काबुक्की

सामना प्रतिनिधी । पिंपरी

तळेगाव दाभाडे येथे नगराध्यक्षांचा पती आणि एक माजी नगरसेवक यांच्यात निवडणूक खर्चाच्या वादातून धक्काबुक्की झाली. या धक्काबुक्कीत माजी नगरसेवकाच्या बोटाला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार नोंदविण्यात आलेली नाही.

तळेगाव दाभाडे येथील भाजपच्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांचे पती संदीप जगनाडे व भाजपचेच माजी नगरसेवक प्रकाश ओसवाल यांच्यात सोमवारी सकाळी घरासमोरील रस्त्यावर जोरदार वाद झाला. वाद विकोपाला जाऊन प्रकरण धक्काबुक्कीपर्यंत पोहोचलं. यामध्ये ओसवाल यांच्या बोटाला गंभीर दुखापत झाली आहे. मात्र जगनाडे यांनी मात्र असा कोणताही प्रकार घडला नसल्याचा दावा केला आहे. आजारी असल्याने आपण दोन दिवस घरीच आहोत, असे जगनाडे यांनी स्पष्टीकरण दिलं.

नगराध्यक्ष निवडणुकीच्या खर्चाबाबत जगनाडे व ओसवाल यांच्यात जुना वाद आहे. सोमवारी सकाळी दोघे समोरासमोर आल्याने वादाची ठिणगी पडली आणि त्याचे रुपांतर धक्काबुक्कीत झाल्याचे समजते. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ही माहिती व्हायरल झाली. सगळ्यात शहरात यावरून चर्चा सुरू होती. भाजप पक्षश्रेष्ठींनी या प्रकरणात लक्ष घालावे आणि पक्षाची बदनामी होईल, असे प्रकार त्वरित थांबवावेत, अशी अपेक्षा भाजप कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.