गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करा -चंद्रकांत पाटील

सामना प्रतिनिधी । कुडाळ

मुंबईतील बहुसंख्य कोकणवासीयांना गणेशोत्सवानिमित्त गावी जाण्यासाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचाच प्रामुख्याने वापर करावा लागतो. त्यामुळे या दरम्यान या महामार्गावर वाढणारा वाहतुकीचा अतिरिक्त ताण विचारात घेऊन गणेशोत्सवापूर्वीच हा महामार्ग वाहतुकीसाठी सुयोग्य करून खड्डेमुक्त करण्यात यावा, अन्यथा संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज एका बैठकीत दिले. तसेच पुढील वर्षीच्या गणेशोत्सवापूर्वी या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे प्रलंबित काम पूर्ण करण्याच्या सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या प्रलंबित भूसंपादन आणि चौपदरीकरण कामाच्या आढावा बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री पाटील यांनी अपूर्ण कामाबाबत अधिकाऱ्यांना सक्त सूचना दिल्या. यापुढील काळात या महामार्गाच्या कामाचा वेग कमी झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दिपक केसरकर आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, दरवर्षी गणपती उत्सवासाठी मुंबईस्थित अनेक चाकरमानी कोकणात गावी जात असतात. त्यामुळे प्रवासादरम्यान कोणताही त्रास होऊ नये, अपघात होऊ नये याकरिता मुंबई गोवा या राष्ट्रीय महामार्गाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत, तसेच महामार्गाचे प्रलंबित भूसंपादन तातडीने पूर्ण करून चौपदरीकरणाचे काम एक वर्षाच्या आत पूर्ण करण्याचे निर्देशही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. पाली-खोपोली पर्यायी मार्गावरचे खड्डेही गणपतीपूर्वी भरून रस्ता वाहतुकीस सुयोग्य करावा. तसेच पेण-वडखळ बायपास रस्ताही खुला करावा.

त्याचप्रमाणे, या महामार्गावर गणेशोत्सव कालावधीत वाढणारा वाहतुकीचा अतिरिक्त ताण काही प्रमाणात कमी होण्याच्या दृष्टीने मुंबई-पुणे-कोल्हापूर मार्गे देखील प्रवास करण्यात येतो. त्यामुळे या महामार्गावरील टोल नाक्यांवर होणारी वाहतुकीची कोंडी विचारात घेऊन गतवर्षी प्रमाणेच या महामार्गावरून गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी देण्यात, यावी असे निर्देश देखील सदर बैठकीत मंत्री पाटील व मंत्री शिंदे यांनी दिले.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक, सचिव (रस्ते) सी. पी. जोशी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे धनराज तावडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे विशेष कार्य अधिकारी सुधीर देऊळगावकर, रायगडचे जिल्हाधिकारी विजय सुर्यवंशी, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी प्रदीप पी. व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे आदी उपस्थिती होते.