गुहेत अडकलेल्या फुटबॉलपटूंवर चित्रपट येणार

सामना ऑनलाईन । चिआंग

थायलंडच्या चियांग राय प्रांतातील थांम लुआंग नांग नोन गुहेत जवळपास सोळा दिवस अडकलेल्या १२ फुटबॉलपटू व त्यांच्या प्रशिक्षकाला मंगळवारी बचावपथकाने बाहेर काढले. या फुटबॉलपटूंना वाचविण्यासाठी थायलंडच्या नेव्ही सील कमांडोंनी अतिशय धाडसाने हे बचाव कार्य पार पाडले. त्यांच्या या धाडसावर लवकरच एक चित्रपट येणार आहे.

हे सर्व फुटबॉलपटू या गुहेत कसे अडकले, १६ दिवस ते या गुहेत कसे जिवंत राहिले, या फुटबॉलपटूंना बचाव पथकाने कशा प्रकारे वाचवले हे जाणून घेण्यासाठी सध्या जगभरात प्रचंड उत्सुकतता आहे. त्यामुळे या फुटबॉलपटूंवर व त्यांना वाचविण्यासाठी कमांडोनी राबविलेल्या बचावकार्यावर चित्रपट काढण्याचा निर्णय हॉलिवूडमधील प्युअर फ्लिक्स फिल्म्सने घेतला आहे. या आगामी चित्रपटाचे सह निर्माते अदाम स्मिथ आणि स्कॉट हे सध्या चियांग राय प्रांतात आले असून ते तेथील लोकांकडून बचाव कार्य सुरू असतानाच्या परिस्थतीचा आढावा घेत आहेत. तसेच थाई नेव्ही सील कमांडो, बचाव पथकात सामील झालेल्ये इतर कमांडो, फुटबॉलपटू व त्यांचे कुटुंबीय, प्रशिक्षक यांची भेट घेऊन त्यांची देखील मुलाखत घेतली जाणार आहे.

थायलंडचा संपूर्ण किशोरवयीन फुटबॉल संघ त्यांच्या प्रशिक्षकासह २६ जून रोजी थायलंडच्या चियांग राय प्रांतातील गुहेमध्ये पर्यटनासाठी गेला होता. यावेळी झालेल्या प्रचंड पाऊस आणि भू-स्खलनामुळे हा संघ गुहेमध्ये अडकला होता. बचाव पथकाच्या तब्बल नऊ दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर या संघातील सर्व मुले गुहेत जिवंत असल्याचे समजले होते. गुहेमध्ये साचलेले पाणी आणि दलदलीमुळे फुटबॉलपटू आणि प्रशिक्षकांना सुखरूप बाहेर काढण्याचे आव्हान बचाव पथकापुढे होते. त्यानंतर १३ विदेशी पाणबुडे व थायलंडच्या नौदलाचे ५ कमांडोजनी शर्थीचे प्रयत्न करत या सर्व मुलांना आणि प्रशिक्षकाला बाहेर काढले.