बोगदा : काळोखा, कंटाळवाणा प्रवास

>> वैष्णवी कानविंदे-पिंगे

बोगद्यासारख्या काळोख्या वाटेतून प्रवास करताना मनात फक्त एकच गोष्ट येते ती म्हणजे ही वाट कधी संपणार ? काही अवधीसाठी ही काळोखी वाट सहन करता येतेही, पण जर संपूर्ण प्रवासच या भयंकर काळोख्या वाटेतून होत असेल आणि तो संपता संपत नसेल तर काय होईल? अगदी तीच अवस्था नुकताच प्रदर्शित झालेला ‘बोगदा’ हा सिनेमा पाहताना होते. अतिशय रेंगाळत, दोन वाक्यांच्या मध्ये, दोन संवादांच्या मध्ये, दोन प्रसंगांच्या मध्ये प्रचंड जागा ठेवत हा सिनेमा इतका जास्त ताणलाय की, त्यामुळे या सिनेमातून जो विषय सांगायचाय तो बाजूलाच राहतो आणि उरतो तो फक्त आणि फक्त कंटाळा!

‘बोगदा’ सिनेमाची ही कथा आई आणि मुलीचं नातं कथन करते. एकमेकांसोबत राहताना फक्त कर्तव्य पार पाडत राहणारी, पण काळासोबत कठोर झालेली मुलगी आणि प्रत्येक क्षण आनंदाने जगायला आसुसलेली आई या दोघांमधला संवाद किंवा आई- मुलीतला नाजूक बंध कुठेतरी हरवलाय. अशातच आईच्या गंभीर आजारपणाबद्दल कळतं आणि आई इच्छामरण हवं असल्याचं मुलीला सांगते. मग त्यातलं द्वंद्व आणि तिच्या शेवटच्या दिवसांची इच्छा म्हणून दोघींनी एकत्र केलेला एक प्रवास म्हणजे हा सिनेमा. हा प्रवास त्यांचा इतक्या वर्षांत अडकलेला नात्याचा प्रवाह मोकळा करतो. त्या मुलीला स्वत:च्या मनात डोकावायला भाग पाडतो आणि बऱयाच गोष्टी उलगडतो. असे एकंदरीत ‘बोगदा’ या सिनेमाचं कथासूत्र. मग आई आणि मुलीच्या नात्याचं पुढे काय होतं, आईची इच्छा पूर्ण होते की एक नवा अध्याय सुरू होतो या गोष्टी सिनेमा पाहताना उलगडतात.

एकूणच हा विषय दोघींमधला, गंभीर. त्यामुळे त्याची हाताळणीही तशीच असणार हे साहजिकच आहे, पण आजवर असे अनेक गंभीर विषय अथपासून इतिपर्यंत गांभीर्याने हाताळूनही त्यांच्यात प्रेक्षकांना खिळवून ठेवायची क्षमता होती हे महत्त्वाचं. म्हणजे मुळात सिनेमा कलात्मक असू शकतो आणि प्रेक्षकाला त्यातली कलात्मकताही तितकीच ओढ लावू शकते, पण कलात्मकतेच्या नावाखाली फक्त काळोखी आणि गडद काळोखी प्रकाश योजना, आकलन न होणाऱया दृष्यांची मालिका, रेंगाळती पटकथा आणि बोजड, जराही खिळवून न ठेवणारे संवाद असा भरणा असेल तर तो सिनेमा कसा गुंतवू शकेल आणि असे सिनेमे भले कलात्मकतेच्या दृष्टीने बनवलेले असोत, व्यावसायिकतेसाठी बनवलेले असोत वा महोत्सवासाठी, पण जिथे प्रेक्षकाला धरून ठेवायची क्षमताच नाही तो सिनेमा कुठल्याही पातळीवर ‘कंटाळवाणा’ याच बिरुदाखाली गणला जाऊ शकतो. ‘बोगदा’ची अवस्था अशीच झालेली आहे. बरं, किमान अशा पद्धतीचा सिनेमा करायचा असल्यास दिग्दर्शकाने वेळेचं भान राखणं अत्यंत महत्त्वाचं असतं, पण इथे तेदेखील नाही. असे सिनेमे पावणेदोन तासांपेक्षा जास्त असतील तरीही डोक्यावरून पाणी आणि हा ‘बोगदा’ तर चक्क पावणेतीन तासांचा आहे. म्हणजे विचार करा, संथ, शिथील स्वरातलं बोलणं, काळोखाचे लोटच्या लोट, चौफेर निरस वातावरण आणि असं सगळं जवळजवळ तीन तास सहन करायचं म्हणजे काय अवस्था होईल?

अर्थात, या सिनेमातली मुख्य कलाकारांच्या अभिनयाची बाजू मात्र चोख आहे. त्यात सुहास जोशी यांनी साकारलेली आई आणि मृण्मयी देशपांडेने साकारलेली मुलगी. या दोघींनीही आपल्या वाटय़ाला आलेलं काम अगदी उत्तम आणि सहज पार पाडलंय यात जराही शंका नाही. मृण्मयीच्या केवळ डोळय़ांतल्या भावांमधूनच तिला काय वाटतंय, तिच्या मनाची काय अवस्था आहे हे दिसून येतं, तर सुहास जोशी या अतिशय सहजसुंदर. बिनधास्तपणे गावातल्या बायकांना जमवून तीन पत्तीचा डाव मांडणारी, मुलीची लालभडक लिपस्टिक, लोंबते कानातले घालून घरातल्या घरातच मिरवणाऱया आणि खमकेपणाने आपले मुद्दे धरून बसणाऱया आईची व्यक्तिरेखा चांगली उभी राहिली आहे. तिच्याकडे बघून छान वाटतं. जीवनावर एवढं प्रेम करू पाहणारी आई जेव्हा मृत्यू जवळ येतोय हे कळल्यावर इच्छामरण व्यक्त करते ते अगदी साहजिकच वाटतं. या दोघांच्या दोन स्वभावांची जुगलबंदी काही ठिकाणी खरंच छान वाटते. या सिनेमात इतरही कलाकार आहेत, पण त्यांचा वावर नगण्य आहे. संपूर्ण सिनेमात या दोघीच दिसत राहतात. या सिनेमाचं संगीत आणि त्याचे शब्दही छान आहेत. ते या सिनेमाच्या निरसतेला उठाव देतात हे नक्की, पण या दोन बाबी सोडल्या तर बाकी सिनेमा का म्हणून पाहावा हे एक कोडंच आहे.

यातली पटकथा आणि संवाद इतके जास्त पसरट आहेत की, ‘‘अरे, आता इथून पुढचं पाऊल टाक’’, ‘‘मागे वळून बघ पटकन’’, ‘‘प्रश्न विचारलाय तुला, उत्तर दे पटापट’’ असं प्रेक्षक म्हणून आपल्यालाच सांगावंसं वाटतं. दृष्यंच्या दृष्यं घडतात, पण त्या दृष्यांमधून काही घडतच नाही. बरं, प्रकाश योजना ही सिनेमासाठी किती महत्त्वाची असते हे हा सिनेमा पाहून समजतं. ऐंशी टक्के सिनेमा काळोखात आणि जो काही उजेड आहे तोदेखील धुरकट, दुधाळ, निराश. सिनेमा न रुचण्याचं हे एक महत्त्वाचं कारण होऊ शकतं. जी बात प्रकाश योजनेची तीच छायांकनाची. एखादी व्यक्ती संवाद बोलतेय आणि कॅमेरा तिच्या पायावर किंवा पाठीवर. म्हणजे एकदा, दोनदा ही बाब ठीक आहे, पण परत परत असं घडायला लागतं तेव्हा नको वाटायला लागतं. तांत्रिकदृष्टय़ा सिनेमा मांडणीतही काही गोष्टी खटकतात. म्हणजे डॉक्टर पेंशटच्या समोरच उभा राहून ‘‘मन घट्ट करा’’ असं सांगतो आणि काय झालंय हे सांगायच्या ऐन वेळी मुलीला सांगतो, ‘‘बाहेर या.’’ असं कसं दाखवू शकतात? परत दुसऱया एका दृष्यात आजाराने जर्जर झालेली स्त्र्ााr झोपलेली असताना तिथेच बसून बायका इच्छामरणाबद्दल बोलतात. म्हणजे जशी प्रकाश योजना, छायांकन या गोष्टी उगाच मुद्दाम केल्यासारख्या वाटतात तसंच ही दृष्यंदेखील. वाटेत मध्येच गाडी थांबवून गाडीवान म्हणतो, ‘‘इथेच मुक्काम करायचा’’ किंवा इच्छामरणासाठी जायचं थम्पू हे गाव गावकऱयांमध्ये प्रसिद्ध असतं. अशा गोष्टी सिनेमाला अधिकाधिक संदर्भहीन करतात. सिनेमातला जर कलात्मक बाज असेल तर तो या प्रकारच्या प्रसंगांमुळे तोकडा पडल्याचं जाणवतं.

एकूणच सिनेमा गहन असेल, बैद्धिक असेल. उगाच उभं होणारं नाटय़ वगळून आयुष्य जसं घडतं तसंच्या तसं उभं करायचा प्रयत्न केला असेल… सगळं असेलही, पण प्रेक्षकाला सिनेमा पाहताना काहीतरी करमणुकीची अपेक्षा असते. भले सिनेमा गंभीर असो, समांतर असो, पण त्यातही प्रेक्षकाला अपेक्षित करमणूक ही असतेच. या सिनेमात बांधून ठेवणारं ते मूल्यच नसेल तर हा सिनेमा त्याने का पाहावा? हा एकच प्रश्न सिनेमा पाहून झाल्यावर उरतो आणि एक चांगला विषय उगाच वाया गेल्याची खंत तेवढी उरते.

दर्जा : **
सिनेमा :बोगदा
निर्माता :सुरेश पानमांद, नंदा पानमांद, करण कोंडे, निशिता केणी
लेखक/दिग्दर्शक :निशिता केणी
छायांकन :प्रदीप विग्नवेळू
संगीत : सिद्धार्थ महादेवन, सौमिल शृंगारपुरे, विशाल ददलानी, शाशा तिरुपती
गीत लेखन : मंदार चोळकर
कलाकार : मृण्मयी देशपांडे, सुहास जोशी, रोहित कोकाटे