पार्टी…न रंगलेली!

1

>> वैष्णवी कानविंदे-पिंगे

‘दिल चाहता है’, ‘रॉक ऑन’सारखे सिनेमे बहुतेकांनी पाहिले असतील, आवडलेही असतील. हे सिनेमे जरी प्रातिनिधिक असले तरी प्रत्येकाच्या आयुष्यात मैत्रीचा खास कप्पा असतोच आणि नंतर आयुष्याच्या रहाटगाडग्यात जुने मित्र मागे पडतात. काही गैरसमज होतात, अडचणींचे डोंगर उभे राहतात. थोडक्यात, आयुष्य बदलतं आणि जुन्या गोष्टी मनात खोलवर गाडल्या जातात. एक दिवस जेव्हा त्या वर येतात तेव्हा पुन्हा सगळं ढवळून निघतं. अगदी याच ओळीवर त्याच प्रसिद्ध सिनेमांचा आभास होत राहावा असा हा ‘पार्टी’ सिनेमा नुकताच प्रदर्शित झालाय. दोन घटका करमणूक जरी असली तरी विशेष नावीन्य नसलेला विषय. कधी फुटकळ विनोद तर कधी अतिनाटय़ यामुळे ही ‘पार्टी’ हवी तशी रंगत नाहीय असं सिनेमा पाहताना वाटत राहतं.

ही कथा आहे चार जिगरी मित्रांची. हे चौघेजण पेम, दारू, मौज, मस्ती असं मनुमराद आयुष्य जगत असतात. प्रत्येक जण वेगवेगळय़ा आर्थिक स्तरातला असतो, पण ते कधीच त्यांच्या मैत्रीच्या आड येत नसतं. मग आयुष्यं आता ‘सेट’ होतायत असं प्रत्येकाला वाटत असतानाच अचानक हा सगळा सेट कोसळतो आणि आयुष्याचा कडवट घोट वाटय़ाला येतो. मग काळ उलटतो आणि पुन्हा जेव्हा हे सगळे एकत्र येतात तेव्हा एका अघटिताला सामोरं जावं लागतं. काय घडतं त्यांच्या आयुष्यात, मधल्या काळात असं काय घडून गेलेलं असतं आणि समोर काय वाढलेलं असतं अशा प्रश्नांची उत्तरं हा सिनेमा पाहताना मिळतात. सिनेमात काही प्रसंग खरंच खुलले आहेत. ते बघून मजादेखील येते, पण काही प्रसंग जरी चांगले असले तरीही सिनेमाची भट्टी मात्र तितकीशी पेटलेली नाही. त्यामुळे सिनेमा बऱयाच ठिकाणी हवा तसा रंगलेला नाही. या सिनेमाने अठरा वर्षांचा काळ दाखवलाय. खरं सांगायचं तर सुरुवातीला तो काळ अठरा वर्षांपूर्वीचा आहे हे जाणवतच नाही, पण कालांतराने अरुणा इराणीचा संदर्भ येतो किंवा व्हिडीओ लायब्ररीतल्या स्क्रीनवर माधुरी, श्रीदेवीचे सिनेमे दिसतात तेव्हा हा जुना काळ आहे हे लक्षात येतं. मग हळूहळू सगळय़ांच्या जुन्या पद्धतीच्या फॅशन्स, मोबाईलचं नसणं वगैरे दिसतं आणि हा काळ जुना असल्याचं जाणवतं, पण तरीही समजा 2000 सालाच्या आसपासचा काळ आहे असं गृहित धरलं तरीही त्यात हिरॉईनचा संदर्भ देताना अरुणा इराणीचा का द्यावा हे काही लक्षात येत नाही किंवा तत्सम अशाच काही गोष्टी. त्यामुळे काळ नेमका कुठला आहे याबाबत गोंधळल्यासारखं वाटतं. अर्थात समुद्राकडे बसणारे अठरा वर्षांपूर्वीचे मित्र आणि अठरा वर्षांनंतरचे मित्र दाखवताना पार्श्वभूमीवर सागरी पूल आधी नसणं आणि नंतर असणं हे मात्र ठळकपणे दाखवलं आहे याचं कौतुक.

अभिनयाच्या बाबतीत कलाकार ठीक आहेत. म्हणजे प्रत्येकाला एक व्यक्तिरेखा नेमून दिली आहे. त्या व्यक्तिरेखेची खास अशी एक जातकुळी आहे आणि त्यात प्रत्येकाने आपापल्यापरीने प्रामाणिकपणे काम केलं आहे. अर्थात माधवी जुवेकरचा आक्रस्ताळेपणा असह्य होतो किंवा वाडीत राहणाऱया मित्राच्या आई, वडील, बहिणीची दृष्यंही उगाच विनोद निर्मिती करायला भरल्यासारखी वाटतात. सिनेमा जरी रंगतदार असला तरी त्याचा गाभा गंभीर आहे. या सिनेमात दर्जेदार विनोद निर्मिती असती तर ही ‘पार्टी’ रंगतदार झाली असती, पण अशा फुटकळ विनोदांमुळे सिनेमाचा एकूणच डोलारा डळमळीत होतो. आणखी एक मुद्दा म्हणजे थेट अठरा वर्षांचा काळ उभा केलेला असला तरी माणसं जराही बदललेली वाटत नाहीत. फक्त मिशी आणि चष्मा लावून कोणी अठरा वर्षांनी मोठं वाटू शकत नाही. इतकंच काय, त्या सुक्रतचे आईवडीलही जसे आधी होते तसेच नंतरही दिसतात. या सिनेमात करमणूक आहे. भाभीच्या घरावर ट्रक आदळण्याचा प्रसंग किंवा भाजीवालीचा प्रसंग असे काही खरोखरच विनोद निर्मिती करणारे प्रसंगही आहेत, पण काही प्रसंग पाहताना प्रश्न पडतात. एक उदाहरण घ्यायचं झालं तर एका व्यक्तीवर अठरा वर्षांपूर्वी फसवणुकीचा आरोप होतो आणि अठरा वर्षांनी भेटायच्या सहा महिने अगोदर ती व्यक्ती कैदेतून मुक्त होते असं दाखवलंय, पण फसवणुकीच्या गुह्याला इतकी वर्षे शिक्षा होते का? हा मोठा प्रश्न आहे.

हिंदुस्थानच्या संघासाठी खेळणारा खेळाडू जेव्हा आपल्या जुन्या आळीत येतो तेव्हा किमान चार मुलं तरी त्याच्या सहीसाठी धावली पाहिजेत ही आपली हिंदुस्थानी संस्कृती आहे, पण त्याला साधी हॉस्पिटलची रिसेप्शनिस्ट किंवा वॉर्डबॉयदेखील ओळखत नाही. अशा अनेक गोष्टी मांडणीत कमी पडल्यासारख्या वाटतात. या काही गोष्टींवर लक्ष केंद्रित करता आलं असतं तर सिनेमाला एक भक्कम पाया मिळाला असता. बाकी लेखन, दिग्दर्शन तसं बरं आहे. संगीतही बरं आहे. सुरुवातीची नामावली ज्या पद्धतीने मांडली आहे ती तर झक्कासच. नातेसंबंधांमधल्या वेगवेगळय़ा छटा चांगल्या उभ्या केल्या आहेत. कोणी मुलींच्या बाबतीत भ्रमर वृत्तीचं तर कोणी प्रेमासाठी सर्वस्व वाहून जाऊ देणारं, कोणी प्रेमभंगाच्या दुःखात अडकलेलं, तर कोणी आकर्षणाच्या मोहपाशात गुरफटलेलं. त्याचप्रमाणे अठरा वर्षांपूर्वीच्या मैत्रीतली सच्चाईदेखील भावते. एकूणच ‘‘आयुष्य हे ‘पार्टी’सारखं असतं, पण ती ‘पार्टी’ जेव्हा संपते तेव्हा ती संपल्याची जाणीव आणि संयम या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात’’ हा संदेश या सिनेमातून मिळतो ही या सिनेमाची आणखी एक जमेची बाजू, पण असं सगळं असलं तरीही त्या गोष्टी या ‘पार्टी’त जान आणायला अपुऱया पडतात हेच खरं.

दर्जा : **
सिनेमा :पार्टी
निर्माता :जिंतेंद्र रमेश चिवळेकर, जमाश्प बापुना, अमित पारेख
दिग्दर्शक :सचिन सुरेश दरेकर
संवाद/पटकथा :सचिन दरेकर, प्रशांत लोके
संगीत : अमितराज
कलाकार : सुक्रत जोशी, अक्षय टांकसाळे, स्तवन शिंदे, रोहित हळदीकर, प्राजक्ता माळी, मंजेरी पुपाला