आणखी एक पाणीदार ग्रह

[email protected]

हस्त नक्षत्र संपलं की आपल्याकडचा पाऊस मुक्काम हलवतो. मेघमालांनी चार महिने आक्रमिलेलं नभ मोकळं होऊ लागतं. ‘झाले मोकळे आकाश’ सर्वात जास्त आनंद देत खगोल अभ्यासकांना आणि दुर्बिणीतून आकाशदर्शनाचा आनंद लुटणाऱ्या दिवाळीच्या दिवसांत भूमीवर प्रकाशाचा आणि लाखो दिव्यांचा उत्सव सुरू असतो तेव्हाच आकाशातही ‘लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया’ अवतरलेली असते.

अनेकदा न्याहाळलं तरी पुन्हा नव्याने पाहताना तारकामंडल तितकंच ‘ताजं’ भासतं. रोजच्या उगवत्या सूर्याची प्रसन्नता रोज नवा उत्साह घेऊन येते, तसेच रात्रीच्या आकाशात डोकावणं ‘स्टार गेझर्स’ किंवा आकाशदर्शन करणाऱ्यांसाठी उत्साहाचं ठरतं. नेहमीचे ग्रह-तारे बघून झाले की, मध्यरात्री चर्चा रंगते ती अथांग अवकाशातलं आणखी कोणतं ‘अज्ञात’ उलगडलंय? मग नव्याने येणारे धूमकेतू ‘सरस्वती’ या दीर्घिकांच्या सुपरक्लस्टरची माहिती किंवा एखाद्या ताऱ्याभोवती फिरणाऱ्या पृथ्वीसारख्या ग्रहाविषयी माहिती दिली जाते. संशोधकांनी केलेलं आपल्या विश्वाचं संशोधन सर्वसामान्यांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचवण्याचं काम ‘खगोल मंडळा’सारख्या संस्था सातत्याने करीत असतात.

रोजच्या वाचनातूनही परदेशातील नव्या खगोलीय संशोधनाविषयी समजतं. सप्टेंबरमध्ये एक बातमी आली की, आपल्या सूर्यमालेपासून ४० प्रकाशवर्षे दूर असलेल्या ‘ट्रपिस्ट-१’ या खुज्या ताऱ्याभोवती असलेल्या ग्रहमालेत आपल्या पृथ्वीसारखा एक ग्रह आढळला आहे. विशेष म्हणजे जीवनासाठी अत्यावश्यक असलेला पाण्याचा साठा असल्याने पृथ्वीसारखाच हा ग्रह ‘पाणीदार’ झाला आहे.

याशिवाय हा ग्रह ट्रपिस्ट-१ या ताऱ्याभोवतीच्या ‘हॅबिटेबल झोन’ म्हणजे जीवसृष्टी निर्माण होईल अशा वसाहतयोग्य अंतरावरून फिरत आहे. हे सारं वर्णन आपल्या पृथ्वीलाही लागू पडतं.

ट्रपिस्ट-१ हा खुजा तारा आपल्या ग्रहमालेतील गुरू ग्रहापेक्षा थोडासाच मोठा आहे. पृथ्वीवरून त्याचा पत्ता सांगायचा तर तो कुंभ राशीच्या पार्श्वभूमीवर आहे. या ताऱ्याला सात ग्रह असून एकूण ‘सिस्टम’ आपल्या सूर्यमालेसारखीच वाटते.

२०१५ मध्ये या खुजा ताऱ्याचा शोध लागला. बेल्जियममधल्या लिग्गी विद्यापीठातील मायकेल गिलन यांनी ट्रॉन्झिट फोटोमेट्री तंत्राचा उपयोग करून ‘ट्रान्झिट प्लॅनेट्स ऍण्ड प्लॅनेटेझिमल्स स्मॉल टेलिस्कोप’ उैर्फ ‘ट्रपिस्ट’ प्रकल्पातून या ताऱ्याचा आणि ग्रहमालेचा शोध लावला. नंतर ‘नासा’च्या स्पिट्झर स्पेस टेलिस्कोप आणि पॅरॅनल येथील व्हेरी लार्ज टेलिस्कोपचा वापर केल्यावर या ताऱ्याच्या ग्रहमालेवर शिक्कामोर्तब झालं.

विशेष म्हणजे या ताऱ्याच्या ‘हॅबिटेबल’ किंवा वसाहतयोग्य ‘झोन’मध्ये चक्क तीन ग्रह आहेत. म्हणजे या खुज्या ग्रहाला तीन ‘पृथ्वी’ असू शकतात. आपल्या ग्रहाच्या आसपासच्या ग्रहांवर आपल्यासारखीच (किंवा वेगळी) जीवसृष्टी असती तर ‘एलियन’ कसे असतात ते आपल्याला समजलं असतं. त्यांची जीवनपद्धती आणि प्रगती या गोष्टींचं आदान-प्रदान होऊ शकलं असतं. ३१ ऑगस्ट २०१७ रोजी हबल स्पेस दुर्बिणीनेही या ग्रहमालेच्या अस्तित्वाला दुजोरा दिला. त्यामुळे त्याविषयीचं कुतूहल अभ्यासकांमध्ये वाढलं आहे.

अशा संशोधनाविषयी अतिशय क्लिष्ट किंवा अतितांत्रिक माहिती देणं हा या सदराचा उद्देश नसून विश्वरचनेचा वैज्ञानिक मागोवा घेत असताना आपल्या विराट विश्वाची व्याप्ती आणि त्याचे आपण एक घटक असून विश्वाचा शोध घेण्याइतके प्रगत झालो आहोत याची जाणीव व्हावी असा आहे. नवे तारे, ग्रह किंवा पृथ्वीसदृश ग्रह अवकाशात अन्यत्र सापडल्याने ‘दुसऱ्या’ जीवसृष्टीचा शोध लागण्याची शक्यता वाढते. त्याची माहिती नव्या काळातील सर्वांनाच, विशेषतः तरुणाईला असायला हवी. हीच मनाची ‘दिवाळी’ आहे.