फाईन आर्टचे विद्यार्थी नियमांच्या कचाट्यात

मुंबई – फाईन आर्ट विषयात अनेक विद्यार्थ्यांना ८०पैकी फक्त ५, १० आणि १५ मार्क देण्यात आले असून या विद्यार्थ्यांचे पुनर्मूल्यांकनही केले जात नसल्याने हे विद्यार्थी अडचणीत आले आहेत. एकीकडे विद्यापीठाच्या तक्रार निवारण समितीने पुनर्मूल्यांकन करून देण्याचे आश्‍वासन दिले असताना परीक्षा विभागात मात्र संबंधित विषयासाठी पुनर्मूल्यांकनाची सोयच नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे वर्ष वाया जाण्याच्या भीतीने गेल्या सहा महिन्यांपासून हे विद्यार्थी न्यायासाठी विद्यापीठात पायपीट करीत आहेत.

रचना कॉलेज, प्रभादेवी; व्हिवा कॉलेज, विरार; बांदेकर कॉलेज, सावंतवाडी आणि जे.जे. कॉलेजच्या २२ विद्यार्थ्यांचा या प्रकरणात निकाल रखडला आहे. मार्च २०१६मध्ये द्वितीय वर्षाच्या झालेल्या या परीक्षेचा निकाल जूनमध्ये जाहीर करण्यात आला. मात्र यात प्रॅक्टिकल विषयात या विद्यार्थ्यांना ५ ते २० दरम्यान गुण देण्यात आले आहेत. याबाबत विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या तक्रार निवारण समितीकडे तक्रार केल्यानंतर त्यांना पुनर्मूल्यांकन करण्यात येईल, असे आश्‍वासन देण्यात आले. मात्र याबाबत परीक्षा विभागात चौकशी करण्यास गेल्यावर मात्र नियमाचे कारण सांगून माघारी पाठवले जात आहे. या प्रकरणात जाचक नियमांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. त्यामुळे याबाबत विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या हिताबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी युवासेनेचे माजी सिनेट सदस्य शशिकांत झोरे यांनी केली आहे.

“फाईन आर्ट विषयातील प्रॅक्टिकल परीक्षांचे पुनर्मूल्यांकन करता येत नाही. याबाबत तसा नियमच आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या तक्रार निवारण समितीने जरी पुनर्मूल्यांकनाचे आश्‍वासन दिले असले तरी प्रॅक्टिकलचे पुनर्मूल्यांकन करता येणार नाही.”
– डॉ. राजीव मिश्रा, संचालक, कला संचालनालय