Pune खोड्या करतो म्हणून दुसरीच्या विद्यार्थ्याला सुतळीने बांधले, मुख्यध्यापीकेसह शिक्षिकेवर गुन्हा

सामना प्रतिनिधी । पुणे

दुसरीमध्ये शिकणारा विद्यार्थी खोड्या करतो म्हणून मुख्याध्यापीकेच्या आदेशानुसार शिक्षिकेने त्याचे हात सुतळीने बांधल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढव्यातील ‘कोठारी नॅशनल स्कूल’च्या मुख्यध्यापीका प्रज्ञा गोखले आणि शिक्षिका  हबीबा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याविरोधात केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाकडेही तक्रार करण्यात आली आहे. सहकारनगर येथे राहाणाऱ्या 38 वर्षीय शिक्षकाने यासंदर्भात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिनियम 2009 च्या कलम 17 आणि जे. जे. अ‍ॅक्ट 2015 कलम 75 नुसार मुख्याध्यापक व शिक्षकावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यामध्ये कोठारी नॅशनल स्कूल आहे. फिर्यादी हे या शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते. तेव्हा 1 नोव्हेंबर 2018 रोजी सकाळी पावणे नऊच्या सुमारास दुसरीतील विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदानावर सोडले होते. त्यावेळी एका विद्यार्थ्याचे हात सुतळीने बांधल्याचे फिर्यादी यांना दिसले. त्यांनी चौकशी केली असता, मुख्याध्यापकांनी वर्ग शिक्षकांना माझे हात बांधण्यास सांगितले आहे असे या विद्यार्थ्याने फिर्यादी यांना सांगितले.

खेळाचा तास संपल्यानंतर फिर्यादी हे दुसरीच्या वर्गात गेले. त्यावेळीही या मुलाचे हात सुतळीने बांधलेले होते. त्यांनी याचे फोटो काढून घेतले. या मुलाचे हात बांधल्याबद्दल त्यांनी शिक्षिका व मुख्याध्यापीकेला जाब विचारला. त्यावेळी त्यांनी हा मुलगा खूप त्रास देतो त्यामुळे त्याचे हात बांधले असल्याचे सांगितले. तसेच याबाबत बाहेर कोठेही वाच्चता करू नये अशी धमकी देऊन फिर्यादी यांना कोणतेही कारण न देता शाळेतून काढून टाकले. ही कृती म्हणजे लहान मुलांचा छळ केल्याचाच प्रकार आहे. त्यामुळे फिर्यादी यांनी 5 फेब्रुवारी रोजी याविरोधात महिला व बाल विकास मंत्रालयाकडे तक्रारीचा ईमेल करून हात बांधल्याचे फोटोही पाठवले होते. त्यानंतर त्यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली. त्यानुसार शाळेच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक वाडकर करत आहेत.