लाखो रुपयांच्या अपहाराप्रकरणी मुख्याधिकारी व नगराध्यक्षासह  तीन जणांवर गुन्हा दाखल 

2

सामना प्रतिनिधी । प्रतिनिधी 

आरोपी ठेकेदार याने बनावट वाहनांची यादी व खोटे कागदपत्र देऊन पालिकेकडून दोन लाख रुपये उकळले.  शहानिशा न करता बिल अदा केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुख्याधिकारी, नगराध्यक्षसह तीन जणांवर कोपरगाव शहर पोलीस ठाणे मध्ये अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

याबाबत माहिती अशी की, पाणी टंचाई काळात कोपरगाव शहरासाठी पाणी पुरवठा करण्याची टेंडर ठेकेदार विलास  दशरथ आव्हाड यांना देण्यात आले होते. या पाणीपुरवठ्या बदल्यात त्यांनी कोपरगाव नगरपालिकेला 2 लाख 10 हजार 178 रुपयांचे बिल दिले. या बिलासोबत ज्या वाहनांनी पाणीपुरवठा केला त्या वाहनांची माहिती दिली होती. या वाहनांची खात्री केली असता या वाहनांमध्ये  मोटरसायकल, पिकअप, संजीवनी कारखान्याचा ट्रॅक्टर असल्याचे निष्पन्न झाले. याचा अर्थ आरोपी ठेकेदार यांनी बनावट वाहने  दाखवून खोटी कागदपत्रे तयार करून कोपरगाव शहरातील नागरिकांची फसवणूक केली आहे.  अशी तक्रार संजय काळे यांनी न्यायालयात दिली होती.

न्यायालयातून 156 (3) चौकशी करण्याबाबत आदेश आल्याने कोपरगाव शहर पोलीस स्थानकात तत्कालीन मुख्याधिकारी शिल्पा दरेकर, ठेकेदार विलास दशरथ आव्हाड,  नगरसेवक रवींद्र पाठक, नगराध्यक्ष विजयराव  वहाडणे व पाणीपुरवठा अभियंता प्रकाश लोखंडे या पाच जणांविरुद्ध   अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्हा दाखल झाल्याने कोपरगाव शहरांमध्ये खळबळ उडाली आहे.