‘जय महाराष्ट्र’ लिहिलेल्या बसच्या ड्राईव्हर, कंडक्टरविरोधात गुन्हा दाखल

सामना ऑनलाईन । कोल्हापूर

कर्नाटकातील मराठी भाषिक सीमालढ्य़ाच्या चळवळीचे प्रमुख केंद्र असलेल्या बेळगाव महापालिकेवरील भगवा ध्वज काढावयाला लावणाऱ्या कर्नाटक सरकारला मराठी भाषिक आणि शौर्याचे प्रतीक असलेल्या भगव्या फेट्य़ाचा भयानक व्देष असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. शिवसेना नेते व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून ‘जय महाराष्ट्र’ या नव्या बोध चिन्हासह महाराष्ट्र परिवहन महामंडळाची गेलेली बस रात्री उशिरा बेळगावात पोहोचली. त्यामुळे सीमाभागात ‘जय महाराष्ट्र’ची लाट उसळली; पण याचीच अॅलर्जी असलेल्या कानडी पोलिसांनी चालक प्रमोद गायकवाड (रा. सातारा) आणि वाहक देविदास मोरटे यांना भगवा फेटा काढायला लावला आणि त्यांच्यावर दोन भाषांत तेढ निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला. यामुळे सीमाभागात प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

महाराष्ट्रात येण्यासाठी साठ वर्षांपासून धडपडणाऱ्या सीमाभागातील मराठी भाषिकांचा जयघोष असलेल्या ‘जय महाराष्ट्र’ या घोषणेवरच बंदी घालण्यासाठी कानडी सरकारने नवा कायदा करणार असल्याचे जाहीर केल्यामुळे खळबळ उडाली होती. पण महाराष्ट्राचे परिवहण मंत्री दिवाकर रावते यांनी महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या एसटीच्या लोगोतच ‘जय महाराष्ट्र’ या जयघोषाचा समावेश केला. ‘जय महाराष्ट्र’ या नव्या लोगोसह काल मुंबईहुन निघालेली एसटी रात्री उशीरा बेळगावात पोहोचली. दरम्यान, महाराष्ट्रातून थेट सीमाभागात ‘जय महाराष्ट्र’ चा गजर करत आलेली ही बस कर्नाटक सरकारच्या डोळ्य़ांत खुपली. बस स्थानकावर आलेल्या कानडी पोलिसांच्या या कारवाईमुळे सीमा भागात संतापाचे वातावरण पसरले आहे.

कानडी पोलिसांकडून धरपकड सुरू
१५ मराठी भाषिक सीमाबांधवांवरही दोन भाषांत तेढ निर्माण करण्यासह अन्य गुन्हे दाखल झाले आहेत. यातील अॅड. अमर येळ्ळूरकर यांना आज सायंकाळी मार्केट पोलिसांनी अटक केली. रात्री उशिरापर्यंत त्यांची तुरुंगात रवानगी करण्याची हालचाल सुरू होती तर उर्वरितांची धरपकड करण्यात येत असल्याने सीमाभागातील वातावरण तणावपूर्ण निर्माण झाले आहे.