हत्याकांडातील साक्षीदारास धमकावल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा


सामना प्रतिनिधी । पारनेर

जिल्हाभर गाजलेल्या संदीप वराळ हत्याकांडातील प्रमुख साक्षीदाराला धमकावल्याप्रकरणी या गुन्हातील जामीनावर असलेले आरोपी बबन कवाद तसेच सुमन बोदगे या महिलेविरोधात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निघोज बसस्थानकाजवळ 21 जानेवारी 2017 रोजी दुपारच्या सुमारास निघोजचे माजी सरपंच संदीप वराळ यांची हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्यामध्ये सरकार पक्षातर्फे विजया विजय उचाळे या प्रमुख साक्षीदार आहेत. सध्या बबन कवाद जामीनावर असून गेल्या दोन महिन्यांपासून विजया उचाळे यांना त्याने बोलविले होते. या प्रकरणी कवाद आरोपी असल्याने आपण त्याच्याकडे जाण्याच्या टाळल्याचे उचाळे यांनी सांगितले. विजया उचाळे यांच्या दिराच्या घरी 9 डिसेंबर रोजी सुमन गंगाराम बोदगे ही महिला आली. उचाळे यांची कौटूंबिक परिस्थिती, मुली याबाबत चर्चा केली. त्यानंतर अचानकपणे संदीप वराळ खून खटल्यात साक्ष देऊ नये, साक्ष दिली तर दोन्ही मुलींचे काहीतरी बरे वाईट होऊ शकते. आपली व आपल्या कुटुंबीयांचीही सीबीआय चौकशी होऊ शकते. या खून खटल्यातील आरोपी सुटल्यानंतर तुझी अवस्था काय होईल याचा विचार केला आहेस का असा सवाल करत उचाळे यांना धमकावले. जामीनावर सुटलेल्या बबन कवादने उचाळे यांना समजावण्यासाठी तसेच समजावूनही ऐकत नसेल तर धमकावण्यासाठी पाठविल्याचे बोदगे या महिलेने सांगितले. आपल्याला धमकावण्यात आल्याने कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी तक्रार दाखल करत असल्याचे उचाळे यांनी सांगितले. उचाळे यांच्या फिर्यादीवरून बबन कवाद व सुमन बोदगे यांच्याविरोधात पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निघोजमधील अवैध व्यवसायाविरोधात तक्रार केल्याच्या रागातून आपल्या विरोधात फिर्याद दाखल करण्यात आल्याचे बबन कवाद याने म्हटले आहे. आपणास निघोजमध्ये जाण्यास न्यायायाने प्रतिबंध केला आहे. त्यामुळे आपण निघोजमध्ये फिरकलेलोही नाही. पोलिसांनी त्याची चौकशी करावी अशी मागणीही त्याने केली आहे.