महावितरणची तार तुटून घरावर पडली, आगीने संसार उद्ध्वस्त

2

सामना प्रतिनिधी । सोलापूर

महावितरण कंपनीच्या मुख्य विद्युत वाहिनीची तार तुटून घरावर पडल्याने लागलेल्या आगीत एक संसार आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.ही दुर्घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांव सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही. मात्र या दुर्घटनेत चौगुले यांचा संसार उघड्यावर पडल्याचे दिसून येत आहे.

कासेगांव ते गंगेवाडी रस्त्यावर असलेल्या महावितरण कंपनीच्या मुख्य विद्युत वाहिनीची तार तुटून ती बिरोबा वस्तीलगत स्वतःच्या शेतात राहणारे बाळासाहेब मनोहर चौगुले यांच्या घरावर पडली. त्यामुळे ठिणग्या उडून लागलेल्या आगीत त्यांच्या घराने पेट घेतला. त्या घरास लागलेली आग वाऱ्यामुळे भडकत असताना तेथेच विद्युत प्रवाहीत तार पडल्याने गावकऱ्यांना आग विझवण्याचे कोणतेही प्रयत्न करता आले नाहीत. या आगीत काही मिनिटात बाळासाहेब चौगुले यांच्या घरातील प्रापंचिक साहित्य, धान्य, भांडी आणि अन्य शेतीचा बारदाना जळून राख झाला.