माहुलच्या भारत पेट्रोलियमच्या प्लाण्टमध्ये भीषण स्फोट

सामना ऑनलाईन, मुंबई

चेंबूरच्या माहुलगाव परिसरातील भारत पेट्रोलियमच्या (बीपीसीएल) हायड्रो-क्रॅकर प्लाण्टमध्ये बुधवारी दुपारी भयंकर स्फोट होऊन भीषण आग लागली. स्फोटाच्या आवाजाने चेंबूर, घाटकोपर ते थेट शीवपर्यंतचा परिसर हादरून गेला. नक्की काय झालंय हे सुरुवातीला न कळल्यामुळे लोकांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती. आजूबाजूच्या गावठाणातील, इमारतींमधील लोक अक्षरशः रस्त्यावर आले होते

स्फोट इतका भयंकर होता की परिसरातील घरांच्या, इमारतींच्या भिंतींना अक्षरशः तडे गेले. परिसरात धुराचे काळेकुट्ट लोट पसरले. आगीत कंपनीतील ४३ कामगार जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून कामगारांची सुटका केल्याने जीवितहानी टळली.

लोकवस्तीमध्ये रिफायनरी

बीपीसीएलच्या बाजूलाच हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनी, टाटाचा प्लांट, इतर रिफायनरी प्लाण्ट, नाफ्थाच्या ऑइलच्या टाक्या, गव्हाणपाडा झोपडपट्टी, विष्णूनगर झोपडपट्टी, मोनोरेल आणि फ्री वे तसेच प्रकल्पबाधितांची घरे आहेत. इथपर्यंत आग पसरल्यास स्फोट होईल या भीतीने रहिवासी अक्षरशः पळत होते. या कंपनीची आग बाजूच्या ‘एचपीसीएल’ कंपनीपर्यंत पोहचल्यास आगीचा प्रचंड भडका उडण्याचा धोका होता, मात्र अग्निशमन दलाच्या प्रयत्नांमुळे ही आग रात्री उशिरा आटोक्यात आली.  क्रॅकरमधील फ्युएल संपेपर्यंत ही आग सुरू होती.