बेहरामपाड्यात जायला भीती वाटते!

64

सामना ऑनलाईन । मुंबई

कितीही मोठी आग असू दे, आगीशी दोन हात करणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांनी वांद्रय़ाच्या गरीबनगर आणि बेहरामपाड्यात आग विझवायला जाण्याचा मात्र धसका घेतला आहे. इथे आग विझवायला गेल्यावर कामात अडथळा आणणाऱ्या जमावाची जवानांना अक्षरशः भीती वाटते. दोन्ही अर्थाने जिवावर उदार होऊन जवान बेहरामपाडय़ात सालाबादप्रमाणे लागणारी आग विझवत असतात. पाण्याचे पाइप हिसकावून घेणे, जवानांना त्यांच्या पद्धतीने काम करू न देणे, ‘हमारे मोहल्ले में पानी डालो’ म्हणत जवानांवर दबाव आणण्याचे प्रकार गुरुवारच्या दुर्घटनेच्या वेळीही घडल्याचे काही जवानांचे म्हणणे आहे. तशा नोंदीही त्यांच्या वह्यांमध्ये करण्यात आल्या आहेत.

झोपड्यांवर कारवाई करायला पालिकेचे पथक गेले की आग लागते. आग विझवायला जवान गेले की त्यांना त्यांचे काम करू दिले जात नाही असेच चित्र दरवेळी असते. बाकीच्या ठिकाणी आग लागल्यानंतर लोक जवानांना मदत करायला पुढे धावतात. इथे मात्र परिस्थिती बिकट असते. जवानांना धक्काबुक्की करणे, अग्निशमन दलाच्या गाडय़ांचा ताबा घेणे, जवानांना शिवीगाळ करणे असे प्रकार घडतात. पाण्याच्या होजलाइन मध्येच तोडून बचावकार्यात अडथळा आणला जातो. इथे जवानांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन काम करावे लागते. या सगळ्या घटनांमुळे अनेकदा घटनास्थळी असलेल्या जवानांकडून जादा पोलीस कुमक मागवली जाते तशी ती यावेळीही मागवली गेली.

स्थानिकांनी जवानांना मार्गदर्शन केले
या आगीत १२० घरे जळाली आहेत. लोकांची घरे जळाल्यामुळे लोक हवालदिल झाले होते. त्यामुळे ते जवानांना मार्गदर्शन करत होते. कोणत्या गल्लीतून कुठे जायचे याची माहिती स्थानिकांना चांगली असते. त्यामुळे ते जवानांना मार्गदर्शन करत होते. मी स्वतः आग विझेपर्यंत सहा तास घटनास्थळी उभा होतो. शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही बेघर झालेल्यांच्या खाण्याची व राहण्याची व्यवस्था केली. आज जिल्हाधिकाऱ्यांच्या सर्वेक्षणासाठी मदत केली.

– हालीम खान, शिवसेना नगरसेवक

दोनदा तक्रार करूनही प्रशासन ढिम्म
सन २०१५ मध्ये पहाटे लागलेली आग विझवताना तिथे आलेल्या जमावाने जवानांना धक्काबुक्की केली, अग्निशमन इंजिन वाहनाचा ताबा घेतला, साहित्याची खेचाखेच केली. त्यात ४० मोटरपंप या नव्याकोऱया गाडीचे नुकसान झाले. याप्रकरणी निर्मलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र पालिका प्रशासनाने याबाबत ठोस उपाययोजना न केल्यामुळे जवानांना मात्र दरवेळी आपला जीव धोक्यात घालावा लागतो.

अग्निशमन दल जवानांच्या तक्रारी नोंदवहीत
आगीची दुर्घटना घडते तेव्हा आग विझवायला आलेले अग्निशमन दलाचे जवान सर्वसामान्यांना देवदूतासारखे वाटतात. सर्वांना आगीपासून लांब सारत ते मात्र स्वतः आगीच्या जवळ जाऊन पाणी मारण्याचे, लोकांना वाचवण्याचे काम करीत असतात. वांद्र्याच्या झोपडपट्टीत आग विझवायला जाणाऱया वांद्रे अग्निशमन दलाच्या जवानांना मात्र दरवेळी भीतीदायक अनुभवाला सामोरे जावे लागते. यापूर्वीही लागलेल्या आगीच्या वेळी असेच अनुभव आल्यामुळे बेहरामपाड्यात, गरीबनगरमध्ये आगी लागल्या की पुढे काय घडणार याची त्यांना कल्पना येते.

जिथे आग लागली आहे त्यावर थेट मारा करत असतानाच जिथे आग लागलेली नाही तिथे पसरू नये म्हणून पाण्याचा मारा करण्याची आमची पद्धत आहे. मात्र अनेक रहिवासी ‘इधर पानी मारो, हमारे घरपे मारो’ म्हणत आम्हाला कामच करू देत नाहीत. – एक जवान

आपली प्रतिक्रिया द्या