अग्निशमन यंत्रणेच्या तपासणीसाठी अधिकाऱयांची सरप्राइज व्हिजिट!

सामना ऑनलाईन,मुंबई

परळच्या ‘क्रिस्टल’ टॉवरमध्ये लागलेल्या आगीत चार जणांचा जीव गेल्यानंतर अग्निशमन दलाने मुंबईतील उंच इमारती-टॉवरमधील अग्निशमन यंत्रणेच्या तपासणीची मोहीम आणखी तीव्र केली आहे. यामध्ये 67 अधिकाऱयांची विशेष टीम तैनात करण्यात आली असून ही टीम प्रत्येक विभागातील सोसायटी-टॉवरमध्ये सरप्राइज व्हिजिट देऊन अग्निशमन यंत्रणा आहे की नाही याची तपासणी करणार आहे. यानंतर दिलेल्या मुदतीत जर अग्निशमन यंत्रणा बसवली नाही तर पालिका कायद्यानुसार वीज-पाणी कापण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

‘क्रिस्टल’ टॉवरमध्ये लागलेल्या भीषण आगीत चार जणांचा मृत्यू झाल्यानंतर पुन्हा एकदा मुंबईतील टोलेजंग इमारतींमधील अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अग्निशमन दलाकडून सर्वेक्षण करण्यात आल्यानंतर यंत्रणा उभारण्याचे आदेश देऊनही बिल्डर-सोसायटींकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. मात्र ‘क्रिस्टल’ इमारतीत लागलेल्या आगीनंतर अग्निशमन दलाने टोलेजंग इमारतींच्या अग्निसुरक्षा यंत्रणेच्या तपासणीसाठी कठोर पावले उचलली आहेत. ‘क्रिस्टल’च्या आगीनंतर मुंबईतल्या सुमारे 56 हजारांहून अधिक इमारतींना ‘ओसी’ नसल्याचे समोर आहे. तसेच सुमारे साडेतीन हजार इमारतीत अग्निशमन यंत्रणा निकामी झाली असून अनेकांनी फायर ऑडिट करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. या पार्श्वभूमीवर इमारतींमधील यंत्रणेची तपासणी वेगात करण्यात येणार असल्याचे अग्निशमन दलाकडून सांगितले.

कारवाई सुरू

अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱयांची टीम कोणतीही माहिती न देता अचानक व्हिजिट दिली जाईल. इमारतीत अग्निरोधक यंत्रणा आहे का? असेल तर त्या यंत्रणेची देखभाल-दुरुस्ती होते का? ती वापरात आहे का? सेफ्टी फायर ऑडिट होते का? याची तपासणी होईल. ही कारवाई सुरू झाली असून आतापर्यंत 30 ते 40 सोसायटय़ांवर कारवाई करण्यात आली आहे.

  • मुंबईतील बहुतांशी इमारतींमधील अग्निरोधक यंत्रणांची सोसायटय़ांकडून देखभाल-दुरुस्ती होत नाही.
  • जानेवारी ते जुलैदरम्यान सहा महिन्यांची यंत्रणेचे फायर ऑडिट करणे आवश्यक आहे, मात्र निम्म्याहून अधिक सोसायटय़ांनी नियम धाब्यावर बसवला आहे.
  • आता नेमलेल्या 67 अधिकाऱयांच्या विशेष टीमकडून मुंबईतील इमारतींची पाहणी केली जाणार आहे.
  • या पाहणीत नियमांचे उल्लंघन झाल्याचे सिद्ध झाल्यास बिल्डर-सोसायटय़ांविरोधात तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे.