आसनगाव येथील आदिवासी वाडीत आग; पाच घरे जळून खाक

22


सामना प्रतिनिधी । कसारा

आसनगाव येथील राध्येशाम इंडस्ट्री जवळील अदिवासी वाडीत अचानक लागलेल्या आगीमुळे पाच आदिवासींची घरे जळून खाक झाली. सुदैवाने यात जिवीतहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. गुरुवारी संध्याकाळी सात वाजता आदिवासी वाडीतील एका चाळीत मनोज शिरपत दखने,जानीबाई शिरपत दखने,विमल भाऊ भोरे, राजु शिरपत दखने, कृष्णा जना दखने यांच्या घरांपैकी एका खोलीत अचानक आग लागली. काही वेळातच आगीने उग्र रुप धारण केले. आगीच्या विळख्यात पाचही घरे सापडली. शिवसेनेच्या काही कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि पोलीस प्रशासनाने प्रयत्न करुन आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत पाचही घरे आगीत भस्मसात झाली होती. या आगीनुळे बाजूच्या जंगलात वणवा लागून वनसंपत्तीचेही मोठ्या प्राणात नुकसान झाले आहे.

आगीचे वृत्त समजताच शहापुरचे तहसीलदार रविंद्र बाविस्कर, शहापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आव्हाड व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आसनगाव शिवसेना व युवासेनेचे कार्यकर्त्यांनी सर्वप्रथम घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नांना तब्बल दीड तासांनी यश आले व आग आटोक्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या