पारनेरमध्ये गाळ्याला आग; 15 लाखांचे नुकसान

35

सामना प्रतिनिधी । पारनेर 

शहरातील पारनेर राळेगणसिद्धी रस्त्यावरील भैरवी अपार्टमेंटमधील गाळयाला लागेल्या भीषण आगीत सुमारे 15 लाखांचे नुकसान झाले आहे. पारनेर राळेगणसिद्धी रस्त्यावर मुरलीधर बोरूडे यांचे भैरवी आपार्टमेंट असून बोरूडे यांच्याच मालकीच्या तळमजल्यावरील गाळ्याला आग लागली. या गाळयामध्ये त्याच परिसरातील नवयुग गणेश मंडळाचे 150 ढोल व ताशे, मंडप, गाद्या, तसेच स्पिकरचे साहित्य ठेवण्यात आले होते. तसेच बोरूडे यांच्या मुलाची दुचाकीही त्यात होती. बुधवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास बोरूडे यांना खिडकीतून धुर येत असल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ तळमजल्यावर येउन बघितले असता त्यांच्या गाळयामधून धूर येत असल्याचे समजले. त्यांनी तातडीने गाळयाचे शटर उघडले, तोपर्यंत आगीने रौद्ररुप धारण केले होते. गाळयासमोर लावलेल्या दुचाकींनी क्षणार्धात पेट घेतला. तसेच बाजूच्या दोन गाळ्यांमध्येही आग पसरू लागली.

बोरूडे आणि नागरिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. तोपर्यंत आग जिन्यापर्यंत पोहचली होती. तेथील विजेचे मीटर काही आणि दुचाकींनीही पेट घेतला. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यावर अग्निशमन दलाला पाचरण करण्यात आले. पुणे जिलह्यातून शिरूरच्या दलापर्यंत परवानगीचे सोपस्कर पूर्ण होईपर्यंत आग वाढली होती. नागरिकांनी टँकर मागवून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या प्रयत्नांना यश आले नाही. त्यावेळी 20 हजार लिटर क्षमतेचा टँकर टंचाईग्रस्त भागाकडे निघाला होता. पोलिसांच्या मदतीने तो अडवून टँकरमधील पाण्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू झाला. सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. मात्र, या आगीत 15 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या