पोर्तुगालच्या जंगलात भीषण आग, ६२ जणांचा कोळसा

सामना ऑनलाईन । लिसबन

पोर्तुगालमधील पिदरॉगो ग्रांडे भागात असणाऱ्या जंगलामध्ये भीषण आग लागली आहे. या आगीत आतापर्यंत ६२ लोकांचा मृत्यू झाला असून ५० पेक्षा जास्त लोकं जखमी झाले आहेत. आगीमुळे जंगल परिसरामध्ये धुराचे मोठे मोठे लोट दिसून येत आहेत. धुरामुळे आगीपासून जीव वाचवण्यासाठी पळणाऱ्या अनेक नागरिकांचा गाडीमध्ये गुदमरून मृत्यू झाला आहे. शनिवारी दुपारपासून ही आग सुरू आहे.

portugal-forest

पंतप्रधान अंतोनियो कोस्टा यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. ‘गेल्या काही वर्षात पोर्तुगालमधील हे सर्वात भीषण नैसर्गिक संकट आहे’, असे पंतप्रधान कोस्टा यांनी म्हटले आहे. दरम्यान, पोर्तुगाल सरकारने मृतांप्रती संवेदना व्यक्त करत तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.

आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सरकारी अधिकारी स्टेट गोम्स यांनी सांगितले. अग्निशमन दलाचे ६०० कर्मचारी सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.