सूरतमध्ये कोचिंग इन्स्टिट्यूटच्या इमारतीला आग; 20 विद्यार्थ्यांचा मृत्यू

236

सामना ऑनलाईन । सूरत

गुजरातच्या सूरतमध्ये कोचिंग इन्स्टिट्यूट असलेल्या एका इमारतीला लागलेल्या आगीत 20 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. इमारतीत अनेकजण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.

घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून युद्धपातळीवर आग विझवण्याचे आणि इमारतीत अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या कोचिंग इन्स्टिट्यूटला आग लागल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर ती इमारतीत पसरल्याचे सांगण्यात आले. आग लागल्यानंतर बचावासाठी काही जणांनी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उड्या मारल्या. त्यात अनेकजण जखमी झाले आहेत. आतापर्यंत पाच जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 18 गाड्या दाखल झाल्या आहेत.

सूरतमधील आगीच्या दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जखमींना सर्वतोपरी मदत करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या