फायर सेफ्टीचे धडे मॉकड्रिल, रेल्वेस्थानकांवर प्रदर्शन


सामना प्रतिनिधी। मुंबई

मुंबई बंदरात व्हिक्टोरिया गोदीतील एक नंबरच्या धक्क्याला 14 एप्रिल 1944 साली लागलेल्या आगीच्या घटनेला 75 वर्षे पूर्ण झाली. एस. एस. फोर्ट स्टीकिन या बोटीला लागलेली आग विझवताना मुंबई अग्निशमन दलातील 66 अधिकारी, जवानांनी प्राणाची आहुती दिली. त्यांची स्मृती चिरंतन राहावी, यासाठी भायखळा येथील अग्निशमन दलाच्या मुख्यालयात त्यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. दरवर्षी हा दिवस ‘अग्निशमन सेवा दिन’ म्हणून पाळण्यात येतो. या निमित्ताने 14 ते 20 एप्रिल दरम्यान ‘अग्निशमन सेवा सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे.

आगीची घटना घडल्यावर बचाव कार्यात अग्निशमन दलाप्रमाणे मुंबईकरांची भूमिका मोलाची असते. या पार्श्वभूमीवर, रेल्वे स्थानकांवर प्रदर्शन, लेक्चरच्या माध्यमातून मुंबईकरांना ‘फायर सेफ्टी’चे धडे दिले जाणार आहेत. रुग्णालयांमध्येही विविध उपक्रमांच्या माध्यमातून बचावकार्यात मदत होण्यासाठी आवश्यक ट्रेनिंगही दिले जाणार आहे.

सप्ताहाचे वैशिष्टय़?

स्थानिक संस्थांचे अग्निशमन दल आणि विविध सामाजिक संस्था आग विझविण्याची विविध प्रात्यक्षिके, फायर ड्रिल, मॉकड्रिल, व्याख्याने, परिसंवाद, प्रदर्शन आणि चित्रफितीच्या माध्यमातून जनजागृतीचे कार्यक्रम राबवणार आहेत.

या कालावधीत चर्चगेट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, भायखळा, घाटकोपर, बोरिवली इत्यादी महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर प्रदर्शन आयोजित करण्यात येईल.

यामध्ये अग्निशमन दल कोणत्या प्रकारे काम करते, उपलब्ध असणारी अत्याधुनिक साधनसामग्री, आगामी नवीन उपक्रम यांची माहिती दिली जाईल. शिवाय आग लागल्यास रहिवाशांनी तातडीने फायर कॉल कुठे-कसा करावा, स्वतः बचावकार्यात कशी मदत करावी, आगीसारख्या दुर्घटनेत कोणती काळजी घ्यावी याबाबत माहिती देण्यात येईल.