अमेरिकेतील फ्लोरिडात गोळीबार, ५ ठार


सामना ऑनलाईन । फ्लोरिडा

अमेरिकेतील फ्लोरिडातल्या फोर्ट लॉडरडेल विमानतळावर शुक्रवारी एका हल्लेखोराने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात पाचजण ठार झाले आणि आठजण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे. हल्ल्याचे कारण अद्याप समजलेले नाही. पोलीस हल्लेखोराची चौकशी करत आहेत.

हल्लेखोर वीस वर्षांचा होता आणि त्याने स्टारवॉर्सचे चित्र असलेला टी-शर्ट घातला होता. तो गन रि-लोड (पुन्हा गोळ्या भरत होता) करत होता त्यावेळी पोलिसांनी गोळीबार करुन त्याला जखमी केले आणि ताब्यात घेतले.

गोळीबाराची घटना विमानतळाच्या टर्मिनस दोनवरील सामान ताब्यात घेण्याच्या भागात (बॅगेज क्लेम एरिया) घडली. पोलिसांनी विमानतळ सील केला असून कोणालाही ये-जा करण्यास बंदी घातली आहे. विमानतळावरील विमानांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. फोर्ट लॉडरडेल विमानतळावर उतरणार असलेल्या विमानांना जवळच्या इतर विमानतळांवर वळवण्यात आले आहे; अशी माहिती विमानतळाच्या प्रशासनाने दिली आहे.