पहिली एसी लोकल धावली; मुंबईकरांचा प्रवास होणार ठंडा ठंडा.. कूल कूल!

फोटो : सचिन लाडे

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईकर ज्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत एसी लोकलची वाट पाहत होते त्या एसी लोकलने आपला प्रवास सुरू केला आहे. बोरीवली ते चर्चगेट या पहिल्या एसी लोकलला आज सकाळी १०.२०वा. ग्रीन सिग्नल दाखवण्यात आला. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, खासदार किरीट सोमय्या यांच्यासह स्थानिक आमदार- खासदार उपस्थित होते. २५ ते २९ डिसेंबरपर्यंत या गाडीच्या चर्चगेट ते बोरिवलीदरम्यान केवळ सहाच फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.

एसी लोकलच्या प्रत्येक डब्यात टीसी!

१ जानेवारीपासून या लोकलच्या विरार ते चर्चगेट अशा दिवसातून १२ फेऱ्या होणार आहेत. या लोकलचा विरार ते चर्चगेटचा सवलतीतील मासिक पास २०४० रुपये इतका असणार आहे. या ट्रेनच्या १२ फेऱ्यांपैकी ८ फेऱ्या चर्चगेट आणि विरारदरम्यान जलद फेऱ्या म्हणून चालविण्यात येणार असून केवळ मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे, अंधेरी, बोरिवली, भाईंदर आणि वसई रोड या स्थानकांवर तिला दोन्ही दिशेला थांबा असेल. उर्वरित ३ जलद फेऱ्या चर्चगेट आणि बोरिवलीदरम्यान चालविण्यात येणार असून त्यांना मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे आणि अंधेरीला दोन्ही दिशेला थांबा असेल. तर एक धीमी फेरी सकाळी लवकर महालक्ष्मी ते बोरिवलीदरम्यान धावेल. पहिल्या सहा महिन्यांसाठी या लोकलचं किमान तिकीट ६५ रुपये तर कमाल तिकीत २०५ रुपये असणार आहे.