जगातील पहिला मधमाशीएवढा वायरलेस रोबो तयार

सामना प्रतिनिधी । मुंबई

शेकडो एकर शेतजमिनीवरील पिकांवर लक्ष ठेवणे किंवा वायुगळतीचा अंदाज घेणे ही कठीण कामे आता छोटा मधमाशीएवढा रोबो करू शकणार आहे. वॉशिंग्टन विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या टीमने जगातील पहिला वायरलेस फ्लाईंग रोबो बनवला आहे. त्याला ‘रोबोफ्लाय’ असे नाव देण्यात आले आहे. अभिमानाची बाब म्हणजे, या टीममध्ये मराठमोळय़ा योगेश चुकेवाड याचाही समावेश आहे. मधमाशीसारखा दिसणाऱ्या या वायरलेस रोबोला लेझर बीमद्वारे ऊर्जा पुरवली जाते.

महाराष्ट्रातील नांदेडच्या योगेश याने पवईच्या आयआयटी मुंबईतून मेकॅनिकल इंजिनीयरिंग केले आहे. त्यानंतर अमेरिकेच्या ऑरिझोना विद्यापीठात त्याने एमएसचे शिक्षण घेतले आणि नंतर वॉशिंग्टन विद्यापीठात प्रवेश घेतला. तेथील सॉयर फूलर, श्याम गोलाकोटा, विक्रम अय्यर आणि जोहान्स जेम्स या शास्त्रज्ञांच्या टीमबरोबर योगेशने ‘रोबोफ्लाय’ बनवला.

योगेश आणि त्याच्या टीमने या रोबोचे डिझाइन स्वत: बनवले आहे. सेन्सर्सच्या मदतीने या रोबोच्या उडण्यावर नियंत्रण ठेवण्याबाबतही योगेशचे संशोधन सुरू आहे. अशा प्रकारचा छोटा रोबो बनवणे स्वस्त आहे आणि जिथे ड्रोन जाऊ शकणार नाहीत अशा ठिकाणी हे रोबो सहज जाऊ शकतात असे योगेशचे म्हणणे आहे.

सध्या या फ्लाईंग-बी रोबोच्या उडण्याला मर्यादा आहेत. कारण त्याला वीज पुरवणारी आणि त्याच्या पंखांवर नियंत्रण ठेवणारी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे ही जड असल्याने ती वाहून नेणे या रोबोला शक्य नाही. परंतु त्यावरही या टीमचे संशोधन सुरू असून लवकरच हा रोबो उंच भरारी घेऊ लागेल असा त्यांना विश्वास आहे. ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथे २३ मे रोजी झालेल्या आंतरराष्ट्रीय ‘रोबोटिक्स ऍण्ड ऑटोमेशन’ परिषदेत या रोबोचे प्रात्यक्षिक योगेश आणि त्याच्या टीमने सादर केले.

असा आहे रोबोफ्लाय
– रोबोचे वजन दातकोरणीच्या काडीपेक्षा किंचित जास्त.
-रोबोच्या मुख्य सर्किटला दोन बाजूला मधमाशीसारखे पंख.
-या सर्किटला ऊर्जा देण्यासाठी एक ऍण्टेना.
-ऍण्टेनावर एक चीप बसवण्यात आली आहे.
-या चीपला लेझर बीमद्वारे ऊर्जा दिली जाते.
-लेझरद्वारे ऊर्जा मिळताच रोबो आपले दोन्ही पंख फडफडू लागतो.

काय करू शकतो फ्लाईंग-बी रोबो
– शेकडो एकर शेतजमिनीवरील पिकांवर लक्ष ठेवणे.
-एखाद्या प्रकल्पात किंवा विभागात वायुगळती झाली तर त्याचा अचूक वेध घेणे.
-ड्रोनशिवाय शक्य नाहीत ती कामे.