पहिले पाढे पंचावन्न नकोत… शिस्तबद्ध काम केले तरच पीएमपीएल टिकेल

सामना प्रतिनिधी ,पुणे

लोकाभिमुख सेवा देणे, पीएमपीएलचा तोटा कमी करणे आणि उत्पन्न वाढीसाठी पीएमपीएलची जुनी व्यवस्था मोडकळीस काढणे गरजेचे होते. त्यासाठी कायद्याच्या चौकटीत राहून नियमांचे पालन करणारी नवीन व्यवस्था निर्माण करून जुनी व्यवस्था मोडकळीस काढली. त्याचा थेट परिणाम पीएमपीएलच्या सेवेवर आणि उत्पन्नवाढीवर झाला. सर्व नियमांचे पालन करत काम केल्यामुळे यावर्षी पीएमपीएलचा संचित तोटा ३४३ कोटींवरून १०० कोटींपर्यंत खाली योणार आहे. या प्रकारच्या व्यवस्थेनुसारच नव्या अधिकाऱ्याने काम केल्यास नक्कीच पीएमपीएल तोट्यातून बाहेर पडेल. अन्यथा, पहिले पाढे पंचावन्न होतील. ते व्हायला नकोत, अशी अपेक्षा तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केली.

पीएमपीएलच्या अध्यक्षपदाचा भार स्वीकारल्यापासूनच मुंढे यांनी पीएमपीएलला पोखरत असणाऱ्या व्यवस्थेविरोधात काम सुरू केले. गेल्या नऊ महिन्यांमध्ये त्यांनी अनेक धडाकेबाज निर्णय घेत पीएमपीएलमधील जुनी व्यवस्था मोडीत काढत कायद्याच्या चौकटीत राहून काम करणारी व्यवस्था निर्माण केली. त्यामुळेच यंदा पीएमपीएलचा संचित तोटा ३४३ कोटींहून थेट १०० कोटींपर्यंत खाली येणार असल्याचे ते ठामपणे सांगत होते. मात्र, आता त्यांची बदली झाल्याने पीएमपीएलच्या अध्यक्षपदी नवीन अधिकारी येणार आहे. नवीन अधिकाऱ्यानेही या कायद्याच्या आणि शिस्तीच्या व्यवस्थेप्रमाणेच काम करावे. तरच पीएमपीएलची सेवा सुधारणार आहे. अन्यथा, पहिले पाढे पंचावन्न होणार आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

दरम्यान, लोकाभिमुख सेवा देण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी चोख पार पाडायला हवी. मी कर्मचाऱ्यांना जबाबदारीने काम करण्यास भाग पाडले. अनावश्यक गोष्टींचा विरोध केला. पीएमपीएलमध्ये पडलेल्या चुकीच्या प्रथा बंद केल्या. बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाई केली. पीएमपीएलचे ज्या गोष्टींमुळे नुकसान होत आहे, अशा गोष्टींचा शोध घेतला. ठेकेदारांचे प्रस्थ मोडीत काढले. जास्तीत जास्त गाड्या मार्गावर आणल्या. मार्गांचे सुसूत्रीकरण केले. त्यामुळे पीएमपीएलच्या उत्पन्नात वाढ होत आहे. अधिकाऱ्यांनी ठरवून दिलेली जबाबदारी आणि कर्मचाऱ्यांनी ठरवून दिलेले काम योग्य पद्धतीने केले, तर पीएमपीएल कधीच तोट्यात जाणार नाही, असे मुंढे यांनी स्पष्ट केले.