सुभाषचंद्र बोस येणार वेबसिरीजमधून भेटीला..

सामना ऑनलाईन । मुंबई

काही महिन्यांपूर्वी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आयुष्यावर आधारित वेबसिरीज येणार अशी बातमी आली होती. सध्या वेबसिरीजच्या दुनियेत नवनवीन प्रयोग होताना दिसत आहेत. त्यामुळे नेताजींवरची ही वेबसिरीज नेमकी कशी असेल, याची उत्सुकता तमाम प्रेक्षकांना लागली होती. आता या गुपितावरचा पडदा उचलला गेला असून निर्माती एकता कपूर हिने ‘बोस- डेड ऑर अलाईव्ह ‘ या तिच्या आगामी वेबसिरीजचा टीझर प्रदर्शित केला आहे.

या वेबसिरीजमध्ये अभिनेता राजकुमार राव नेताजी बोस यांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या भूमिकेसाठी राजकुमारने ११ किलो वजन वाढवलं आहे. राजकुमार राव याने साकारलेले नेताजी बोस कसे दिसतील, याचीही उत्सुकता शमली असून, नेताजी बोस यांच्या भूमिकेची पहिली झलकही प्रदर्शित करण्यात आली आहे.

पाहा नेताजी बोस यांच्या भूमिकेची पहिली झलक-

एकता कपूरच्या अल्ट बालाजी तर्फे याची निर्मिती केली जाणार आहे. तर एक था टायगर, बजरंगी भाईजानसारखे चित्रपट दिग्दर्शित करणारे कबीर खान या वेबसिरीजद्वारे डिजिटल माध्यमातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहेत.

सुभाषचंद्र बोस यांनी केलेली आझाद हिंद सेनेची सुरुवात, त्यातलं महिलांचं योगदान आणि आझाद हिंद सेनेशी संबंधित कधीही समोर न आलेल्या मुद्द्यांवर या वेबसिरीजमधून प्रकाश टाकण्यात येणार आहे. या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली असून येत्या १८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणाऱ्या बोस- डेड ऑर अलाईव्हच्या ट्रेलरमध्ये नेमकं काय पाहायला मिळणार, याचे अंदाज बांधले जात आहेत.

पाहा बोस-डेड ऑर अलाईव्हचा टीझर-