‘बाटला हाऊस’चे ‘ब्रम्हास्त्र’ आणि ‘मेड इन चायना’सोबत एन्काऊन्टर


सामना ऑनलाईन,मुंबई

अभिनेता जॉन अब्राहमची भूमिका असलेल्या बाटला हाऊसचा पहिला लूक प्रसिद्ध करण्यात आला आहे. जॉन अब्राहमने ट्विटरचा आधार घेत या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांना दाखवले आहे. २००८ साली झालेल्या दिल्लीतील बाटला हाऊस चकमकीवर हा चित्रपट आधारीत आहे. या चित्रपटामध्ये जॉन अब्राहम पोलीस उपायुक्त संजीव कुमार यादव यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.

हा चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार असून त्याची टक्कर बॉक्स ऑफीसवर अमिताभ बच्चन, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची भूमिका असलेल्या ब्रम्हास्त्र आणि राजकुमार राव तसेच मौनी रॉयची भूमिका असलेल्या मेड इन चायनासोबत होणार आहे.

या चित्रपटातची निर्मिती जॉन अब्राहमच्याच कंपनीने केली आहे. दिल्लीतील बाटला हाऊस परिसरातील इमारतीमध्ये १३ सप्टेंबर २००८ साली दिल्लीत ३ ठिकाणी स्फोट घडवून आणणारे दहशतवादी लपले होते. पोलिसांनी या इमारतीमध्ये घुसून 2 दहशतवाद्यांचे एन्काऊंटर केले होते आणि 2 दहशतवाद्यांना जिवंत पकडले होते. या कारवाईमध्ये ६० पेक्षा अधिक एन्काऊन्टर करणारे मोहनचंद शर्मा हे शहीद झाले होते. बाटला हाऊस चकमकीला 2 वर्ष पूर्ण झाल्याच्या दिवशी दहशतवाद्यांनी दिल्लीतील जामा मशिद परिसरात गोळीबार केला होता, ज्यात तैवानचे 2 नागरीक जखमी झाले होते. या चकमकीप्रकरणी शूरवीर पोलिसांचे गलिच्छ राजकारणासाठी खच्चीकरण करण्यात आले होते. पोलिसांना मानवाधिकार आयोगसमोर उभे करण्यात आले. आयोगाने पोलिसांना क्लीनचिट दिली होती.