पाहा सलमानच्या ‘भारत’चा फर्स्ट लूक

सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचा आगामी बहुचर्चित चित्रपट ‘भारत’ चा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटाचा निर्माता अतुल अग्निहोत्री याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून हे पोस्टर शेअर केले आहे.

‘भारत’च्या पोस्टरमध्ये सलमान आणि कतरिना वाघा-अटारी बॉर्डरच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभे दिसत आहेत. या चित्रपटातील कतरिनाचा लूक हा आतापर्यंतचा वेगळा लूक असल्याचे दिसून येत आहे. यात तिने साडी नेसली असून केस देखील कुरळे केलेले आहेत. सलमान आणि कतरिनाचा चित्रपटातील हा फर्स्ट लूक बघूनच त्यांच्या चाहत्यांची उत्सुकतता शिगेला पोहोचली आहे.

अली अब्बास जफर दिग्दर्शित भारत या चित्रपटात सलमान कतरिना व दिशा पटानी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सुरुवातीला या चित्रपटात कतरिनाच्या जागी प्रियंका चोप्राची वर्णी लागली होती. मात्र प्रियंकाने शूटींग सुरू व्हायच्या काही दिवस आधीच चित्रपटातून माघार घेतली होती.