पहिला संक्रांत सण

2

<< संजीवनी धुरी-जाधव >>

सुवासिनी महिला ज्या सणांची आवर्जून वाट पाहत असतात तो सण म्हणजे मकर संक्रांत. नवविवाहित महिलांसाठी हा सण महत्त्वाचा समजला जातो. त्यामुळे ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतील मानसी अर्थात मयूरी देशमुख तिच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यात लग्नानंतर मकर संक्रांत साजरी करणार आहे.

लग्नानंतर तिचा हा पहिलाच संक्रांत सण… त्यामुळे तिला खूप उत्सुकता लागून राहिली आहे. पहिलाच असल्याने हा सण ती अगदी पारंपरिक पद्धतीने साजरा करणार आहे. पूजेविषयी तिला फारशी माहिती नाही. म्हणून मग सासूला सगळी पद्धत विचारून त्याप्रमाणे पूजा करणार आहे.
काय बेत?

आज काळय़ा रंगाची साडी नेसेन. काळा रंग मला आवडतो. पण माहेरी काळा रंग चालायचा नाही. त्यामुळे आज सासूआईने पार्सल पाठवलेली साडी नेसणार आहे. हलव्याचे दागिने पाठवले असतील तर ते आवडीने घालेन. त्या सगळय़ांचा फोटो काढून त्यांना पाठवेन. आजची संक्रांत लक्षात राहावी अशा पद्धतीनेच साजरी करणार.

फेब्रुवारीत हळदीकुंकू

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात मला तीन दिवस सुट्टी मिळेल. त्यावेळी नांदेडला जाण्याचा विचार आहे. तिथे गेल्यावर तिथेही हळदीकुंकू करणार आहे. विशेष म्हणजे यंदा मी पतंग उडवणार आहे. सेटवर सगळेच हौशी असल्याने पतंग उडवणार आहोत. तसेच आज खाण्याची देखील मैफल रंगणार आहे. सणाच्या दिवशी सगळेजण छान छान पदार्थ बनवून आणतात.

तीळगुळाच्या वडय़ांचा बेत

ती म्हणते, शूटिंगमुळे फारसा वेळ मिळत नाही पण यावेळी मी तीळगुळाच्या वडय़ा केल्या आहेत. त्या कशा बनवायच्या त्या सासूआईने दाखवल्या होत्या. त्यामुळे तीळगुळाच्या वडय़ा यावेळची खास स्पेशालिटी आहे. पर्यावरणाबाबत मी खूप जागरूक आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक बर्ड फिडर वाण देणार आहे. घराच्या बाल्कनीत हे बर्ड फिडर ठेवल्याने पशुपक्ष्यांना त्याचा उपयोग होणार आहे.