पहिला निकाल रात्रीच्या जेवणाला, संपूर्ण निकालासाठी शुक्रवार उजाडणार

14

सामना प्रतिनिधी । मुंबई

लोकसभा निवडणुकीत यावेळी प्रथमच ‘ईव्हीएम’ मशीनला ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रणा जोडण्यात आली आहे. लोकसभा मतदारसंघात येणाऱया विधानसभा क्षेत्रातील प्रत्येकी पाच केंद्रांवरील ‘व्हीव्हीपॅट’मधील चिठ्ठय़ांची मोजणी झाल्यावरच अंतिम निवडणूक निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या सर्व प्रक्रियेस लागणारा कालावधी विचारात घेता दरवेळी लागणाऱ्या कालावधीपेक्षा पाच तासांहून अधिक कालावधी लागणार आहे. त्यामुळे साधारणतः गुरुवारी सायंकाळी साडेआठ वाजेपर्यंत पहिला अंतिम निकाल अपेक्षित असून काही मतदारसंघांत निकालासाठी शुक्रवार पहाटेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी मतदान केलेल्या उमेदवारालाच मत दिले गेले की नाही याची खातरजमा करण्यासाठी ‘ईव्हीएम’ यंत्रणेसोबतच ‘व्हीव्हीपॅट’ मशीन लावण्यात आले आहे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. याचाच अर्थ प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील 30 मतदान केंद्रांतील ‘ईव्हीएम’ मशीन आणि ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रणेतील चिठ्ठ्यांच्या बेरजेची पडताळणी करून निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

अशी होणार मतांची पडताळणी
प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय ‘व्हीव्हीपॅट’ची मोजणी झाल्यानंतर त्याची पडताळणी ‘ईव्हीएम’द्वारे पडलेल्या मतदानाशी करण्यात येणार आहे. ‘व्हीव्हीपॅट’द्वारे मोजण्यात आलेले मतदान आणि ‘ईक्हीएम’द्वारे मोजलेले मतदान जुळले नाही तर पुन्हा ‘व्हीव्हीपॅट’ची मोजणी करण्यात येईल. एकतर ‘व्हीव्हीपॅट’द्वारे मोजलेल्या मतदानाची किंवा ‘ईव्हीएम’शी ते जुळेपर्यंत त्याची फेरमोजणी करण्यात येईल आणि त्यानंतरच निकाल घोषित करण्यात येतील. अशा प्रकारे सहाही विधानसभा मतदारसंघांतील ‘व्हीव्हीपॅट’ची मोजणी करण्यात येईल. मतांच्या पडताळणीत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमधील मतांची संख्या जुळत नसल्यास सरतेशेवटी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार व्हीव्हीपॅटमध्ये नोंदविले गेलेले मतदान ग्राह्य धरत अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

– व्हीव्हीपॅट मोजणीसाठी लॉटरी
मतमोजणीसाठी कोणत्या केंद्रावरील ‘व्हीव्हीपॅट’ची निवड करायची हे लॉटरीद्वारे निश्चित करण्यात येणार आहे. त्यासाठी ‘व्हीव्हीपॅट’च्या संख्येएवढ्या चिठ्ठ्या तयार करण्यात येणार असून त्याद्वारे प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून पाच अशा 30 चिठ्ठ्या काढण्यात येतील. या चिठ्ठय़ा उमेदवाराच्या प्रतिनिधींसमोर तयार करण्यात येणार आहेत. ‘व्हीव्हीपॅट’च्या मोजणीसाठी किमान सहा फेऱ्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघात होणार आहेत.

– मतमोजणीची प्रक्रिया अशी पार पडणार
सकाळी 7 वाजता केंद्रीय निवडणूक निरीक्षक, राजकीय पक्ष व उमेदवारांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत ‘ईव्हीएम’ मशीन ठेवण्यात आलेला स्ट्राँग रूम उघडण्यात येईल.

निवडणूक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत 8 वाजता पोस्टल मतांची मोजणी करण्यास सुरुवात होईल.

ही मोजणी सुरू असतानाच 8 वाजून 30 मिनिटांनी ‘ईव्हीएम’ द्वारे नोंदविण्यात आलेल्या मतांची मोजणी करण्यास सुरुवात करण्यात येईल.

सर्व ‘ईव्हीएम’ मशीनमधील मतांची मोजणी पूर्ण झाल्यावर प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील पाच मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठय़ांची मोजणी करण्यात येईल.

या पाच केंद्रांवरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमधील मतांची पडताळणी करून अंतिम निकाल जाहीर करण्यात येईल.

निकाल येण्यास उशीर का?
एका ईव्हीएममधील मतांची मोजणी करण्यास 30 मिनिटे लागतात.

लोकसभा मतदारसंघात एका फेरीत साधारणतः 72 ईव्हीएमची मोजणी.

मतमोजणीच्या किमान 18 ते कमाल 25 फेऱया पार पडतील.

प्रत्येक लोकसभा मतदारसंघात व्हीव्हीपॅट मोजणीच्या सहा फेऱया पार पडतील.

एका व्हीव्हीपॅटमधील मतांची मोजणी करण्यास 45 मिनिटे.

वीस हजारांहून कमी मताधिक्य असल्यास शेवटपर्यंत धाकधूक
एका मतदान केंद्रावर साधारणतः 1000 ते 1200 मतदार असतात. एका केंद्रावर साधारणतः पन्नास टक्के मतदान झाले असे गृहीत धरले तरी ज्या ठिकाणी पहिल्या क्रमांकावरील उमेदवारचे मताधिक्य 20 हजारांहून कमी असेल त्या मतदारसंघातील उमेदवारास व्हीव्हीपॅटमधील मतांची मोजणी पूर्ण होईपर्यंत म्हणजे शेवटपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

मुंबईत येथे होणार मतमोजणी
उत्तर मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, उत्तर-मध्य मुंबई

बॉम्बे एक्झिबिशन सेंटर्स,
नेस्को गोरेगाव पूर्व

उत्तर-पूर्व मुंबई
उदयांचल प्राथमिक शाळा, (गोदरेज ऍण्ड बॉइस कंपनी) विक्रोळी पूर्व

दक्षिण, दक्षिण-मध्य मुंबई
न्यू शिवडी वेअर हाऊस, गाडी अड्डाजवळ, एम. एस. रोड, मुंबई पोर्ट ट्रस्ट, शिवडी पूर्व

आपली प्रतिक्रिया द्या