आधी नागपूरकडे पहा!

गुंडगिरी व महिलांवरील अत्याचाराविरोधात गेल्या सहा महिन्यांत किमान दीडशे वेळा नागपूरची जनता रस्त्यावर उतरली आहे. तिने आक्रोश केला आहे. पोलिसांशी संघर्ष केला आहे, पण न्याय आणि सुरक्षा मागणाऱ्या जनतेवर पोलिसांनी लाठ्या चालवल्या. गेल्या कित्येक वर्षांत पाटण्यात असे प्रकार घडल्याची नोंद नाही. तेव्हा मुख्यमंत्री, आधी नागपूरकडे पहा. मुख्यमंत्र्यांसह भाजप मंत्र्यांची भाषणे ही फक्त धूळफेक आहे. शिवसेनेने मुंबई वाचवली आहे. नागपूरसारखी शहरे भाजपच्या मगरी जबड्यातून वाचवायला हवीत. नागपूरचे ‘शिकागो’ होत आहे काय?

आधी नागपूरकडे पहा!

मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण भाजप सार्वजनिक मंडळाचे लक्ष मुंबईकडेच आहे. महाराष्ट्र राज्यात इतरही अनेक जिल्हे आणि शहरे आहेत याचा विसर सरकार चालविणाऱ्यांना पडलेला दिसतोय. मुख्यमंत्री फडणवीस नागपूरचे प्रतिनिधित्व करतात. नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. आपल्या स्वत:च्या हक्काच्या नागपूरला वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री व त्यांचे लोक मुंबई-पुण्यावरच त्यांच्या गिधाडी घिरट्या मारीत आहेत. मुंबईचे पाटणा झाले आहे असे एक विधान राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केले, पण आर्थिक बजबजपुरी, बेशिस्त व गुंडगिरीच्या बाबतीत नागपूरने ‘शिकागो’लाही मागे टाकले की काय? देशातील कोणत्याही शहराचा अपमान आम्ही करू इच्छित नाही, पण ‘मुंबई’, ‘ठाणे’, ‘पुणे’ शहरांच्या कारभाराकडे बोट दाखविण्याआधी भाजपने, खासकरून मुख्यमंत्र्यांनी नागपुरातील उकिरडा कसा साफ करता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे. नागपूरला मधल्या काळात डेंग्यूची फक्त लागण झाली नाही तर शेकडो लोक डेंग्यूच्या डंखाने आडवे झाले व लोकांना आरोग्य सुविधा पुरविण्यात नागपूर पालिकेचे प्रशासन कमजोर पडले. मुंबईत शिवसेनेचे राज्य असल्याने डेंग्यू मच्छरांना मारणारी फवारणी, कचरा निर्मूलन चांगले झाले. त्यामुळे डेंग्यू-मलेरियाचा डंख मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला नाही, पण त्यांच्या नागपूर शहरात आरोग्य सेवेची यंत्रणाच कोलमडली हे सत्य ते पारदर्शकपणे स्वीकारणार आहेत काय? शहरात अनेक ठिकाणी बेकायदेशीर बांधकामे व खोदकामे  सुरू आहेत. राजभवन परिसरही त्यातून सुटलेला नाही. गांधीबाग परिसरात महापालिकेकडून सुरू असलेल्या कामासाठी जे खोदकाम सुरू आहे त्यात पडून एका बालकाचा मृत्यू झाला. विद्यापीठ, ग्रंथालय चौकातही असाच मृत्यू झाला. गेल्या पाच वर्षांत नागपुरातील रस्त्यांवरील खड्डय़ात पडून कितीजणांचे मृत्यू झाले व कितीजण अपघातात कायमचे जायबंदी झाले याचा हिशेब मुख्यमंत्र्यांनी द्यायला हवा. नागपूरचे बहुतेक रस्ते हे रस्ते किंवा फुटपाथ नसून फक्त खड्डेच झाले आहेत व ठेकेदारांना पाठीशी घालून भ्रष्ट व्यवहार केल्यामुळेच रस्त्यांची ही अवस्था झाली आहे. नागपूरची महानगरपालिका अनेक वर्षे भारतीय जनता पक्षाकडेच आहे. तेथे त्यांचे संपूर्ण बहुमत असताना शहराचा नेमका काय विकास झाला? याचे ‘पारदर्शी’ उत्तर मुख्यमंत्री देऊ शकतील काय? शहरातील उद्यानांची अवस्था भयंकर आहे. काळ्या यादीतील ठेकेदारांचीच अरेरावी आजही नागपूरच्या महानगरपालिकेत सुरू आहे. महापालिकेच्या शाळांची अवस्था, इमारतींची अवस्था वाईट आहे. त्यांची दुरुस्ती करता येईल, पण शाळेतील संस्कार आणि संस्कृतीचे काय? महापालिकेच्या शाळेतील एका धार्मिक उत्सवात ‘केक’ कापण्यासाठी मुलाच्या हातात चक्क तलवार दिली गेली. नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे व संस्कृती रक्षणाच्या बाबतीत संघ कायम दक्ष आणि सावधान असतो. संघ विचारांचे लोक नागपूर महानगरपालिकेचे कारभारी असतात. धार्मिक उत्सवात विद्यार्थ्यांना तलवारी सोपवून केक कापायला लावणे कोणत्या शैक्षणिक शिस्तीत बसते? नागपुरात कायदा आणि सुव्यवस्थेचा जो साफ बोजवारा उडाला आहे तो पाहता त्या बोजवाऱ्यांचे प्रतिबिंब तेथील शाळांवरही पडलेले दिसते. मुख्यमंत्री नागपूरचे. गृहखाते त्यांच्या ताब्यात, पण नागपूरची सामान्य जनता जीव मुठीत धरून का दिवस काढीत आहे? नागपुरातील स्त्रीयांना संध्याकाळी घराबाहेर पडणे मुश्कील बनले आहे. गळ्यातील मंगळसूत्रे भररस्त्यावर, दिवसाढवळ्या खेचली जातात. खून, चोऱ्या, बलात्कारासारख्या गुन्हय़ांचा नागपुरात हैदोस सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी ते न पाहता मुंबईची तुलना पाटण्याशी करावी याचे आश्चर्य वाटते. गुंडगिरी व महिलांवरील अत्याचाराविरोधात गेल्या सहा महिन्यांत किमान दीडशे वेळा नागपूरची जनता रस्त्यावर उतरली आहे. तिने आक्रोश केला आहे, अश्रू ढाळले आहेत. पोलिसांशी संघर्ष केला आहे, पण न्याय आणि सुरक्षा मागणाऱ्या जनतेवर पोलिसांनी लाठ्या चालवल्या. गेल्या कित्येक वर्षांत पाटण्यात असे प्रकार घडल्याची नोंद नाही. तेव्हा मुख्यमंत्री, आधी नागपूरकडे पहा. मुख्यमंत्र्यांसह भाजप मंत्र्यांची भाषणे ही फक्त धूळफेक आहे. शिवसेनेने मुंबई वाचवली आहे. नागपूरसारखी शहरे भाजपच्या मगरी जबढ्यातून वाचवायला हवीत. नागपूरचे ‘शिकागो’ होत आहे काय?