व्यसनाची पहिली पायरी- हुक्का पार्लर

>>दीपेश मोरे

गोरेगाव येथील हुक्का पार्लरमध्ये मित्रांसोबत बर्थ डे सेलिब्रेशन करण्यासाठी गेलेल्या तरुणाची क्षुल्लक कारणावरून हत्या करण्यात आली. यामुळे पुन्हा एकदा हुक्का पार्लर पुन्हा चर्चेत आली आहेत. मुंबईच नव्हे तर पुणे, नाशिक या शहरांसह राज्यात ठिकठिकाणी हुक्का पार्लरची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. ऐन वयात आलेल्या मुलांमध्ये अशा पार्लरमध्ये जाऊन दम मारण्याचे फॅडही तितकेच वाढत असल्यामुळे वाढती हुक्का पार्लर पालकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. फक्त डोकेदुखीच नाही तर ही हुक्का पार्लर म्हणजे व्यसनाची पहिली पायरीच असल्याचे म्हटले जात आहे. असे असताना यासाठी देण्यात येणारे परवाने आणि कारवाईचे अधिकार यावरून शासकीय यंत्रणांमध्ये प्रचंड संभ्रम आहे. शासकीय यंत्रणांच्या टोलवाटोलवीमुळे तरुण पिढी मात्र व्यसनाधीन होत आहे हे मात्र नक्की!

हुक्का पार्लरमध्ये जाणे म्हणजे उंची लाइफस्टाइल मानली जाते. उच्चभ्रू वस्ती आणि सधन घरातील मुलेच अशा पार्लरमध्ये जातात असे काही दिवसांपूर्वी चित्र होते, मात्र हे चित्र आता बदलले आहे. सर्वसामान्य कुटुंबातील मुलेही आता हुक्का पार्लरकडे वळत आहेत. डान्सबारप्रमाणेच हुक्का पार्लरमध्ये जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे हे खरेच चिंताजनक आहे. पालिकेकडून हॉटेल परवाना तसेच स्मोकिंग झोनच्या नावाखाली, फ्लेवरचा बहाणा करून तंबाखूजन्य पदार्थांचा सर्रास वापर केला जातो. हेच थांबायला हवं. हुक्का पार्लरच्या विरोधातील शेकडो तक्रारी रोज येत असतात, पण नेमक्या कोणत्या कायद्याखाली कारवाई करायची असा पेच यंत्रणांना पडतो. याची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली असून गृह विभागाबरोबरच यासंबधी येणाऱया विविध विभागांतील अधिकाऱ्यांची एक समिती बनविण्यात आली आहे. या समितीच्या शिफारसीनुसार हुक्का पार्लरसाठी सरकार लवकरच नवीन नियमावली आणि कायदा आणण्याच्या तयारीत आहे.

पोलीस म्हणतात…
हुक्का पार्लर यांना परवाना हा महापालिका प्रशासनाकडून दिला जातो. पालिकेकडून हॉटेल परवाना घेऊन त्याधारे हुक्का पार्लर सुरू केले जाते. पार्लरवर कारवाई करण्याचे कोणतेही अधिकार पोलिसांकडे नाहीत. त्या ठिकाणी हुक्काच्या नावाखाली काही गैरप्रकार आढळल्यास आम्ही कारवाई करू शकतो, अशी माहिती एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांनी दिली. विश्वासार्ह माहितीशिवाय छापा टाकला आणि काहीच आक्षेपार्ह न आढळल्यास हुक्का पार्लरवाले पोलिसांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात. एकतर अधिकार नाहीत आणि दुसरीकडे विनाकारण गोवले जाण्याची भीती यामुळे कुणीही अधिकारी कारवाई करण्यासाठी पुढे येत नसल्याचेही हा अधिकारी म्हणाला.

सर्वच यंत्रणांमध्ये समन्वय हवाय
हुक्का पार्लरच्या नावाखाली चालणारे वाईट प्रकार रोखण्यासाठी महापालिका, पोलीस, अन्न आणि औषध प्रशासन या व यासंबंधात येणाऱया सर्व शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय असणे महत्त्वाचे आहे. अनेक हुक्का पार्लरमध्ये फ्लेवरच्या नावाखाली तंबाखूचा वापर केला जातो. नशा येते म्हणूनच तरुण पिढी याकडे वळत असल्याने अमली पदार्थांचा वापर होत असल्याचीही दाट शक्यता आहे. कोणत्याही एका यंत्रणेकडे अधिकार नसला तरी सर्वच यंत्रणांनी एकमेकांशी समन्वय राखल्यास गैरप्रकार निश्चित रोखता येतील.

सर्वोच्च न्यायालयाने उठवली बंदी
मुंबईमध्ये शिवसेनेच्या तत्कालीन महापौर शुभा राऊळ यांनी हुक्का पार्लरवर धडक कारवाई केली होती. मात्र या कारवाईविरोधात हुक्का पार्लर चालविणाऱयांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत दाद मागितली. सर्वोच्च न्यायालयाने २०१४ साली हुक्का पार्लरवरील बंदी उठविण्याचे आदेश दिले. तेव्हापासून हुक्का पार्लर सुसाट सुरू आहेत.
पोलीस कारवाई कधी होते?
-कोणत्याही परवान्याशिवाय हुक्का पार्लर सुरू असल्यास.
-हुक्का पार्लरमध्ये अल्पवयीन मुले आढळल्यास.
-अमली पदार्थाचे सेवन केले जात असल्यास अमली पदार्थविरोधी कायद्यांतर्गत बडगा.
-कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर.
-सिगारेट अथवा तंबाखूजन्य पदार्थांचा वापर होत असल्यास.