वसईकरांच्या ताटातून म्हावरं गायब, तेल सर्वेक्षणाचा फटका

57

सामना प्रतिनिधी । वसई 

तळलेले पापलेट, सुरमई, बोंबील, कोळंबी, मांदेलीचा रस्सा, रावस, बांगडय़ाचे कालवण… वसईकरांच्या ताटात हमखास दिसणारा हा मेनू गायब झाला आहे. तेही मासळी दुष्काळाने नव्हे तर समुद्रातील तेल सर्वेक्षणामुळे. ओएनजीसीने वसईच्या समुद्रात तेल सर्वेक्षण सुरू केल्याने मासेमारी बंद झाली असून त्याचा फटका मच्छीमारांना सहन करावा लागत आहे, तर आवक घटल्याने माशांचे भाव वधारले असून खवय्यांवर सुक्या मासळीची ‘चव’ घेण्याची वेळ ओढावली आहे.

वसई तालुक्यात अर्नाळा, पाचूबंदर, नायगाव आणि इतर भागांत मोठय़ा प्रमाणावर मासेमारीचा व्यवसाय केला जातो. मात्र ओएनजीसी कंपनीने या भागात तेल सर्वेक्षण सुरू केल्याने मासेमारी बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे माशांची आवक घटली असून किमती वाढवण्यात आल्या आहेत. किरकोळ विक्रेत्यांनाही चढय़ा दराने मासळी खरेदी करावी लागत असल्याने बाजारात मासळीचे भाव 200 ते 300 रुपयांनी वाढले आहेत.

  • वसई ते डहाणूपर्यंतच्या समुद्रकिनाऱयावर गेल्या दोन वर्षांत अनेक सागरी जीव मृत किंवा जखमी अवस्थेत कोळी बांधवांच्या जाळ्यात सापडण्याच्या घटना समोर आल्या आहेत.
  • डॉल्फिन व दुर्मिळ प्रजातींच्या कासवांचा यामध्ये समावेश आहे. आतापर्यंत 30 पेक्षाही जास्त डॉल्फिन मृत झाल्याचे सांगण्यात येते.
  • ओएनजीसी कंपनीच्या वतीने सर्व्हे यापूर्वीही केला जात होता. त्यात खोल समुद्रात स्फोट करण्यात आल्यामुळे त्याच्या हादऱयाने डॉल्फिन मासे व कासवे दगावत असल्याचे मच्छीमार बांधवांनी सांगितले.
आपली प्रतिक्रिया द्या