मच्छीमारांसमोर जेलिफिशचे संकट, मत्स्य उत्पादनावर परिणाम  

3

सामना प्रतिनिधीमालवण

गेल्या काही वर्षाचा विचार करता या मत्स्य हंगामात मच्छीमारांच्या जाळीत अपेक्षित मासळी मिळाली असल्याचे चित्र  होते. मत्स्योत्पादनातही काहीशी वाढ झाली. असे असताना मच्छीमारांसमोर जेलिफिशचे संकट उभे राहिले आहे. मासेमारी जाळीत मोठ्या संख्येने जेलिफिश सापडत असल्याने मत्स्य उत्पादनावर परिणाम झाला आहे.

खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या बोटी तसेच किनारपट्टीवरील रापण व अन्य प्रकारच्या पारंपरिक मच्छिमारांच्या जाळीत मोठ्या संख्येने निळ्या रंगाचे जेलिफिश सापडून येत आहेत. हे जेलिफिश प्रामुख्याने समुद्रातील मत्स्य खाद्य व माश्यांची अंडी खात आहेत. त्यामुळे मासे दूर जात असून मासेमारीवर परिणाम झाला आहे.

मासेमारी जाळीत हे जेलिफिश सापडल्याने समुद्रातून जाळी ओढतानही अडचणी निर्माण होत आहेत. तर या जेलिफिशन स्पर्श झाल्यास शरीरास खाज सुटण्याचे प्रकार घडत आहेत.  जेलिफिशच्या या आक्रमणामुळे मच्छिमार मोठ्या संकटात सापडला आहे. मालवण समुद्रात मासेमारी जाळीत सापडलेले जेलिफिश मोठ्या संख्येने किनाऱ्यावर दिसून येत आहेत.

पूर्वी पिवळ्या रंगाचे आता निळ्या-जांभळ्या रंगाचे जेलिफिश 

पूर्वी पिवळ्या रंगाचे जेलिफिश मासेमारी जाळीत सापडून यायचे. मात्र आता समुद्रात अगदी किनाऱ्या पर्यत निळ्या रंगाचे मोठे जेलिफिश मासेमारी जाळीत सापडत आहेत. समुद्रातील अनधिकृत व बेकायदेशीर एलईडी लाईट मासेमारी मुळे अन्न साखळीवर परिणाम झाल्याचा हा प्रकार आहे. अशी चर्चा किनारपट्टीवरील मच्छिमार बांधवामध्ये सुरू आहे.