दर्याचा राजा समस्यांच्या जाळ्यात

सामना ऑनलाईन । अलिबाग

वातावरणातील बदल आणि मत्स्य दुष्काळाशी झुंज देत असतानाच आता जेलीफिशचे नवीन संकट मच्छीमारासमोर येऊन ठेपले आहे. त्यातच डिझेलचा खर्च परवडत नसल्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून नवगावातील सुमारे १६५ मच्छीमार नौका बंदरावरच नांगरून ठेवण्यात आल्या आहेत. मासेमारी पूर्णपणे बंद असल्यामुळे येथील मच्छीमारांना सध्या उधारी आणि उसनवारीवरच उदरनिर्वाह करावा लागत आहे.

एकीकडे बाजारात मोठमोठे मासे पाहून ‘हल्ली मासळी खूप येतेना’ असे उद्गार सहज तोंडून निघतात; पण प्रत्यक्षात ही खोल समुद्रातील मासेमारी आहे. समुद्रात थोड्याच अंतरावर जाऊन मच्छीमारी करणाऱ्या ससकर-डोलकरांची अवस्था मात्र किती बिकट आहे. हे अलिबागच्या नवगावामध्ये नांगरून ठेवलेल्या होड्यांकडे पाहून कळते. येथील जवळपास १६५ मच्छीमार नौका गेल्या तीन महिन्यांपासून बंदरावर नांगरून ठेवल्या आहेत. गेल्या काही महिन्यांत बोटी समुद्रात उतरविल्याच नसल्याने खलाशीही आपल्या गावी निघून गेले आहेत. सरकारने कर्जमुक्ती देऊन बळीराजाला दिलासा दिला आहे. तसेच मत्स्य दुष्काळ जाहीर करून कोळीबांधवांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी येथील डोलकरांनी केली आहे. तसेच आपल्या या मागण्या शासनदरबारी मांडण्यासाठी अलिबागमध्ये जिह्यातील मच्छीमार संघटनांची विशेष सभा बोलविण्यात आली आहे.

व्हलांडी ओस पडली

नवगाव समुद्रकिनाऱ्यावर ठिकठिकाणी लाकडी काठ्यांची विशिष्ट पद्धतीची मांडणी पहायला मिळते. याला त्यांच्या भाषेत व्हलांडी असे म्हणतात. बोंबील, वाकटी सुकविण्यासाठी याचा वापर होतो. परंतु गेल्या तीन महिन्यांपासून ही व्हलांडी मच्छीच्या प्रतीक्षेत आहे. मासेच मिळत नसल्याने ती रिकामी असल्याचे कोळीबांधवांनी सांगितले. तसेच जवळा वाहून नेणारे ड्रमही मोठ्या प्रमाणात समुद्रावर रिकामेच पडल्याचे पहायला मिळते. मच्छी सुकविण्याचे ओटेही रिकामेच आहेत.
– सरकार मच्छीमारीचा दुष्काळ जाहीर करीत नाही. समुद्रात मासे मिळत नाहीत. धाडस करून बोट पाण्यात उतरविली तर डिझेलचा व इतर खर्च अंगावर पडतो. त्यामुळे बोट नांगरून ठेवावी लागत असल्याची व्यथा मच्छीमार उल्हास काटकरे यांनी मांडली.
– वादळी पाऊस आणि जेलीफिशमुळे मासेमारी करताना मोठा त्रास होतो, मासेही पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत. त्यामुळे नुकसान होण्याचा धोका आहे, असे उमेश पावसे यांनी सांगितले.