कारवार समुद्रात ट्रॉलरला आग, मच्छिमाराचा मृत्यू

सामना प्रतिनिधी, पणजी

कारवारच्या नौदल तळापासून सुमारे तीन सागरी मैल अंतरावरील खोल समुद्रात मच्छिमारी ट्रॉलरला लागलेल्या भीषण आगीत एका मच्छिमाराचा भाजून मृत्यू आला तर अन्य एक गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली. हिंदुस्थानी नौदलाने घटनास्थळी रवाना होऊन बचावकार्यात भाग घेतला.

कारवारच्या नौदल तळापासून तीन सागरी मैल अंतरावरील खोल समुद्रात कारवारचे काही मच्छिमार ट्रॉलरवरून मच्छिमारी करीत होते. या मच्छिमारी दरम्यान या ट्रॉलरवर आग लागण्याची घटना घडली. अन्न शिजवण्यासाठी या ट्रॉलरवरील मच्छिमारांनी केरोसिन वर चालणारा स्टोव्ह चालू केला होता. या स्टोव्हचा भडका उडून ट्रॉलरच्या इंजुन रूमने पेट घेतला. त्यात एका मच्छिमाराचा भाजून मृत्यू आला, तर अन्य एक मच्छिमार गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडल्याचं हिंदुस्थानी नौदलाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. या मच्छिमारी ट्रॉलरचे नाव ‘जलपद्मा’ असे आहे. हिंदुस्थानी नौदलाने आगीवर नियंत्रण मिळवून मच्छिमारी ट्रॉलर व खलाशांना किनाऱ्यावर सुखरूप आणले.

मच्छिमार ट्रॉलरला आग लागल्याची माहिती मिळताच हिंदुस्थानी नौदलाची अतिजलद नौका व एक टग मदत कार्यासाठी घटनास्थळी रवाना झाला. नौदलाच्या जवानांनी तासाभराच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. नौदलाच्या जहाजावरूनच अन्य मच्छिमारांना धक्क्यावर आणण्यात आले. या घटनेची नंतर स्थानिक पोलीसांना व मच्छिमार खात्याला नौदलाकडून माहिती देण्यात आली.

summary- fishing boat set on fire one fisherman died